नगर महान्यूज लाईव्ह
दिवसाढवळ्या तो आणि त्याचे सज्ञान दोन साथीदार घरातून महागडे मोबाईल चोरायचा.. त्याची विक्रीही करायचा.. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल ३४ वेळा त्याची चोरी खपली.. लपली.. मात्र गुन्हेगार कितीही शातीर असला, तरी कधी ना कधी सापडतोच.. त्याचे दिवस भरले आणि ते सारेच पोलिसांच्या ताब्यात सापडले..
सावधान, कोतवाली पोलिस ठाण्यात आता चंद्रशेखर यादवांचे वादळ घोंगावते आहे.. त्यांच्या हद्दीत आता चोऱ्या करताना चोरट्यांना आपली शंभरी भरलीच हे समजायला हरकत नाही. यादव यांनी नुकताच एका चोरीचा छडा लावला, ज्यामध्ये एका अल्पवयीन चोरट्यासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पावणेपाच लाखांचे ३२ मोबाईल व २ टॅब जप्त केले आहेत.
यासंदर्भात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेली माहिती अशी, नगरमधील आगरकरमळ्यातील बेलेश्वर कॉलनीत राहणाऱ्या कविता संदीप पांढरपोटे यांनी आपले दोन मोबाईल राहत्या घरातून चोरी झाले आहेत अशी फिर्याद कोतवाली पोलिसांकडे दिली. ३० जानेवारी २०२३ रोजी हा प्रकार घडला होता. ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी ही फिर्याद दिली.
कोतवाली पोलिसांकडे यापूर्वीही मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पोलिस सतर्क झाले. या दरम्यान खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोऱ्या एक लहान मुलगा करीत असून तो याच गुन्ह्यातील चोरीच्या फोनसह केडगाव लिंक रोड परिसरात विक्रीसाठी येणार होता.
ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना केली. लिंकरोड परिसर येथे सापळा लावला, तेथे काही वेळाने एक अल्पवयीन मुलगा आला व तो त्याचेकडील एक मोबाईल फोन दोन हजार रुपयांना तेथील काही लोकांना विक्री करायची आहे असे सांगू लागला. त्यास पथकाने ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली.
त्यावेळी त्याने हा मोबाईल फोन बेलेश्वर कॉलनी आगकरमळा येथून चोरी केला व तो केडगांव वेशीजवळील एका मोबाईल शॉपीमधून सदर मोबाईलचा लॉक तोडुन फॉरमॅट करुन घेतला आहे व आता पैशांची आवश्यकता असल्याने तो विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी विचारपूस केल्यानंतर त्याने यापूर्वी केडगाव परिसरातून अनेक ठिकाणाहून मोबाईल फोन व टॅब चोरल्याची माहिती दिली. हे मोबाईल तो लॉक तोडून फॉरमेट करण्यासाठी केडगांव येथील जगदंबा मोबाईल शॉपी व अस्लम मोबाईल शॉपीकडे देत असल्याचेही यात निष्पन्न झाले.
त्यावरून पोलिसांनी जगदंबा मोबाईल शॉपीचा चालक सतीश रघुनाथ दुबे (वय २३ वर्षे रा मोहिनीनगर केडगांवअहमदनगर) व अस्लम मोबाईल शॉपीचा चालक अस्लम फकीरमोहंमद सय्यद (वय २५ वर्ष रा केडगांव वेशीमध्ये केडगांव अहमदनगर) या दोघांकडे चौकशी केली. त्यावरून त्या दोघांनीही आतापर्यंत ४ लाख ७० हजार रुपयांचे मोबाईल विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली.
ही कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार मनोज कचरे, शितल मुगडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अशोक सायकर, अशोक कांबळे, जयश्री सुद्रिक यांच्या पथकाने केली.
दरम्यान या गुन्हयाचा पुढील तपास हवालदार गणेश धोत्रे हे करीत आहेत. आतापर्यंत यातील 3 गुन्हे उघडकीस आले असून बाकी मोबाईलची खात्री करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.