भिगवण : महान्यूज लाईव्ह
रविवारी भरधावकार दुभाजकावर आढळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी होती, त्यात काल रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम पाहून येत असताना दुभाजकावर वेगात दुचाकी धडकली आणि एकाचा जीव गेला. दोन जण गंभीर जखमी झाले.
धनंजय दामोदर धुमाळ(वय २२, रा.कुंभारगाव ता. इंदापूर जि.पुणे) हा तरुण जागीच ठार झाला आहे तर भारत पांडुरंग पोंदकुले (वय २२, रा. कुंभारगाव ) व किशोर दत्तात्रय घोडके(वय २३ पत्ता माहीत नाही) हे दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील पालकांना मात्र मोठा हादरा बसला आहे. पालक अस्वस्थ आहेत.
आज गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास भिगवण जवळील सकुंडे वस्ती येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. डाळज येथील यात्रेत असलेल्या मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी हे तिघेजण दुचाकीवरून गेले होते. तिकडून पुन्हा तक्रारवाडीच्या यात्रेतील मनोरंजनाचा दुसरा कार्यक्रम पाहण्यासाठी ते तक्रारवाडी कडे गेले आणि तक्रारवाडी होऊन कुंभारगावकडे परत निघताना वेगाने दुचाकी दुभाजकावर आदळली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सकुंडेवस्ती जवळ ते सेवा रस्त्याने जात असताना दुचाकी गतिरोधकावर आदळली. पाठीमागे बसलेल्या धनंजय याच्या मणक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्याचे इतर दोन्ही मित्र जखमी झाले. दोघांवर भिगवण येथे उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समीर करे करीत आहेत.