बारामती : महान्यूज लाईव्ह
ब्रिटिश कालीन सांडपाण्याची व्यवस्था केलेल्या मेणवली अर्थात ड्रेनेजच्या टाकीमध्ये श्वास गुदमरल्याने बारामती तालुक्यातील खांडज येथील २२ फाटा येथील चार जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. यामध्ये मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि चुलत्या बरोबरच शेजारी व्यक्तीलासुद्धा यामध्ये आपला जीव गमवावा लागला.
प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहूजी गव्हाणे अशी या चार जणांची नावे आहेत. ब्रिटिशकालीन मेनवलीच्या माध्यमातून सांडपाण्याचा शेतीच्या पाण्यामध्ये वापर केला जात होता. यातील पाणी खेचण्याच्या विजेच्या पंपामध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुलगा या मेनवलीमध्ये उतरला होता.
मात्र त्याचा श्वास गुदमरू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी आत मध्ये प्रवेश केला आणि नंतर या दोघांना वाचण्यासाठी एकापाठोपाठ एक चौघेजण गेले आणि चौघा जणांचा श्वास गुदमरून चौघा जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि अनेकांना धक्का बसला. एकाच कुटुंबातील तिघा जणांना यामध्ये जीव गमवावा लागला. बारामती तालुक्यातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे.
ही घटना घडल्यानंतर लागलीच त्यांना बारामतीतील सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या संदर्भातील अधिक माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश जगताप यांनी दिली.