राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या २२ वर्षापासून ताब्यात असलेल्या आणि ते अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप खरेच आहेत, मी स्वतः खासदार राऊत यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहे, अशी माहिती दौंड राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खासदार संजय राऊत यांनी काल भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप आमदार राहुल कुल हे यांच्यावर भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप करीत शेतकऱ्यांना लुटले आहे असा खळबळजनक आरोप केला आहे. त्याचे पडसाद आज तालुक्यातील अनेक गावांमध्ये उमटले आहेत.
आमदार कुल यांच्या समर्थक सभासदांनी संजय राऊत यांच्या विरोधात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, जोडो मारो आंदोलन करुन निषेध नोंदवला. दरम्यान याबाबत पाटस येथे पत्रकारांशी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, जिल्हा बँकेचे भीमा पाटस कारखान्याकडे १७९ कोटी थकीत असुन त्याची व्याजासह देणी अद्याप दिली नाही.
त्यासाठी त्यांना कायदेशीर मुदतवाढ ही दिली होती. त्या मुदतवाढीचा कालावधी ही संपला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात त्यांच्यावर जी काय कायदेशीर कारवाई आहे ती केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात खासदार संजय राऊत यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
मुळात भीमा पाटस कारखान्यात भ्रष्टाचार झाला हे खरे आहे, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीस कोटी रुपयांची मदत केली मात्र ३६ कोटी मिळूनही भीमा पाटस कारखान्याचे गाळप सलग तीन वर्ष बंद होते, तीन वर्षे कारखाना का बंद ठेवला याचे उत्तर मात्र ते देत नाही, मग आता कोणत्यातरी निराणी ग्रुपला २५ वर्षाच्या भाडेतत्त्वाच्या करारावर कारखाना चालवायला दिला आणि आता त्याचे गाळप इतके झाले त्याची साखर पोती इतकी झाली असे तिथे बसून अध्यक्ष महोदय सांगतात.
मग खाजगीत कारखाना चांगला चालतो, तर मग तेच कामगार, तीच कारखान्याची यंत्रसामुग्री असताना सहकार मध्ये तुम्हाला हा कारखाना चांगला का चालवता आला नाही? असा सवाल थोरात यांनी यावेळी केला.
याच्या आधी तरी आम्ही तुमच्या कामात हस्तक्षेप केला नाही, मग आता भ्रष्टाचार झाला, हे खरं असताना आम्ही बोललो तर मग हे विरोधक राजकीय हेतूने आरोप करतात असे बोलून आपली चोरी दडपण्याचा प्रयत्न आमदार कुल हे करीत आहेत. कुल यांनी कोणाकडे स्वतःची मालमत्ता गहाण ठेवली हे जाहीर करावे असे आव्हान थोरात यांनी दिले आहे.
उलट यांनी कोट्यवधी रुपयाची साखर पोती परस्पर विकली आणि साखर जाळण्याचा कट रचला. रात्रीत मोकळी साखर पोती गोळा करून ती जाळली आणि बोंब उठवली की साखर पोत्यांना आग लागली. पोलीस चौकशीत साखर पोती जळाली नसल्याचे जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणाची ही चौकशी व्हायला हवी.
आमदार कुल यांच्या बगलबच्च्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. मात्र शेतकरी सभासद आणि जनतेच्या सगळे लक्षात आहे. जनता सुजाण आहे. पुढील दोन दिवसांत सर्वांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या वतीने संजय राऊत यांच्यासंदर्भात पुढील भुमिका ठरवणार आहे. अशी माहिती रमेश थोरात यांनी दिली.