दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : पोलिस ठाण्यातील महिला ठाणे अंमलदार असलेल्या महिला हवालदाराने पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार जळीताची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला तक्रार न घेताच आरोपीसारखे ताटकळत ठेऊन त्याला अमानुष वागणुक दिली व अरेरावाची भाषा वापरुन, धमकी देऊन तक्रारदार पतीपत्नीला हाकलून दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे असून ही घटना वाई पोलिस ठाण्यात घडली आहे.
या वागणुकीमुळे तक्रारदाराला मनस्तापाला सामोरे जावे लागल्याने तक्रारदार यांनी संबंधित हवालदाराच्या विरोधात पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख व जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास उपोषण किंवा आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजेंद्र सुभेदार जाधव हे खानापुर (ता.वाई) येथे पत्नी व एक लहान मुलगा असे तिघे मळावस्ती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा सैन्यात मणिपूर येथे कार्यरत आहे. १२ मार्च रोजी रात्री ११ वाजणेच्या सुमारास दरवाजांना आतून कड्या लावून खिडक्या बंद करून हे कुटुंब झोपी गेले असताना अंदाजे दिड वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने दारांना बाहेरुन कड्या लावून एका दाराला जिवीतास धोका निर्माण होईल अशा घातक द्रव्याचा आणी केमिकलचा वापर करून दरवाजाला आग लावली.
त्या वेळी पेटत असलेल्या दरवाजा मधुन तयार झालेले धुराचे लोट संपूर्ण घरात घुसले. त्या मुळे पत्नीचा श्वास
गुदमरला. त्या जाग्या झाल्या, तर संपूर्ण घरात धुर दिसून आल्याने त्यांनी पतीला उठवले. पण धुरामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते त्यांनी तातडीने समोरची दारे उघडण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरुन दारांना कड्या असल्याने त्यांच्यावर घरातच गुदमरून प्राण सोडण्याची वेळ आली होती. पण पाठीमागच्या दाराला बाहेरुन कडी नसल्याने हे तिघेही दार उघडून बाहेर पडले.
ते पुढच्या पोर्चमध्ये आले असता, घराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या सागवानी दरवाजाला कोणी अज्ञाताने आग लावल्याचे दिसून आले. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले. या तिघांनीही घरातील पाण्याच्या साहाय्याने ही आग विझवली व दुचाकीवरुन रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास थेट वाई पोलिस ठाणे गाठले.
तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी या गंभीर घटनेची माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली. त्यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रगस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांना तातडीने घटनास्थळावर जाण्याचे आदेश दिले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेऊन त्याचा अहवाल बाळासाहेब भरणे यांना दिला. त्यानंतर जळीताचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
तक्रारदार राजेंद्र जाधव हे तक्रार दाखल करण्या साठी वाई पोलिस ठाण्यात चार वाजण्याच्या सुमारास
आपली पत्नी आणी लहान मुलगा यांना सोबत घेऊन पोहोचले. त्या वेळी तेथे सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे आणी पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज असे दोघेही उपस्थित होते. त्या दोघांनी ठाणे अंमलदार असलेल्या महिला हवालदारास जळीताचा गुन्हा दाखल करुन घ्या असे आदेश दिले होते .
राजेंद्र जाधव हे घडल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी ठाणे अंमलदार असलेल्या हवालदारापुढे थांबले असता त्यांनी तब्बल पाऊणतास त्यांना ताटकळत ठेऊन आरोपीसारखी वागणूक दिली व सोबत असलेल्या पत्नीला व मुलाला पोलिस ठाण्यातुन बाहेर हाकलून दिले व दमदाटी केली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
दरम्यान आधीच भयभीत झालेले हे तक्रारदार कुटुंब निराश व हतबल होऊन पोलिस ठाण्यातुन बाहेर पडले .
संबंधित महिला पोलिस हवालदार एरव्ही देखील अरेरावीची भाषा वापरत असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी या गंभीर घटनेत लक्ष घालून वाई पोलिस ठाण्यातील या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी तक्रारदार राजेंद्र सुभेदार जाधव यांनी केली आहे.