राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला. राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यहार करत आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करीत ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशीची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर मात्र दौंड तालुक्यात मोठे राजकीय वादळ उठले, खासदार संजय राऊत यांनी आमदार कुल यांच्यावर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप करीत तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या कळीच्या मुद्याला हात घालत जणू मुळावरच घाव घातल्याची भावना व्यक्त केली गेली. तर राऊत यांनी केलेले आरोप आमदार कुल यांच्या समर्थक सभासदांना चांगलेच जिव्हारी लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
दुसरीकडे भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे व माजी आमदार रमेश थोरात हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. माजी आमदार रमेश थोरात आणि कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी काल पुण्यात दिवसभर एकत्र येऊन खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप हे कसे बरोबर आहेत असे ठामपणे सांगत मीडिया समोर आमदार कुल यांनी सभासद व कामगारांच्या मालकीच्या कारखान्यात कसा कारभार केला याची मालिकाच वाचून दाखवली.
थोरात आणि ताकवणे एकत्र आल्याने दौंड तालुक्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. मात्र खासदार संजय राऊत यांनी आमदार कुल यांच्यावर भष्टाचाऱ्यांचे आरोप करण्यापूर्वीच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी कारखानात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याची तक्रार साखर आयुक्त, सहकार आयुक्त तसेच राज्याचे गृह विभाग, यवत यवत पोलीस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी नामदेव ताकवणे यांनी थेट न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हे आमदार असल्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याने त्यांची चौकशी होऊ शकली नाही. असा आरोप ताकवणे यांनी केला.
मागील अनेक वर्षापासून ताकवणे हे एकटेच भीमा सहकारी कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून कायदेशीर लढा देत आमदार कुल यांना टक्कर देत आहेत. नामदेव ताकवणे यांनी केलेल्या या भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे त्यावेळी फारसं गंभीर घेण्यात आलेले नव्हते, मात्र काल खासदार संजय राऊत यांनी आमदार कुल यांच्या कारखान्याची पाचशे कोटींचा भष्टाचाऱ्याची चौकशी करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर मात्र या प्रकरणाला गांभीर्याने घेतले गेले.
तर आमदार कूल यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी आमदार रमेश थोरात यांनीही जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना कारखान्याला कर्ज देऊन कशी मदत केली हे सांगत कारखान्याच्या अध्यक्षांनी बँकेचे कर्ज आज देतो उद्या देतो असे म्हणत घेतलेले कर्जाची परतफेड करण्याची टाळाटाळ केली. बँकेच्या ताब्यात असलेली कोट्यावधीची रूपयांची साखर होती, मात्र फक्त पोती जाळली असा गंभीर आरोपही थोरात यांनी केला.
ऊस वाहतूकीसाठी एका ट्रॅक्टरवर वेगवेगळ्या पाच बँकेचे कर्ज काढून बँकांची दिशाभूल फसवणूक केली आहे. त्यामुळे भीमा पाटस कारखान्यात मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात आले आणि याच मुद्द्यावर माजी आमदार रमेश थोरात आणि माजी संचालक नामदेव ताकवणे एकत्र आल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आता या प्रकरणात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या आमदार राहुल कुल यांना छुपी मदत करीत असल्याची चर्चा असून थोरात यांच्यावर दबाव आणणार का ? तर दुसरीकडे नामदेव ताकवणे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते तर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या प्रकरणात भाजपमधील अनेक नेत्यांचा नामदेव ताकवणे यांना छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे ताकवणे यांचे तोंड बंद करण्यासाठी आमदार राहुल कुल हे कोणती राजकीय खेळी करत भाजपच्या वरिष्ठनेत्यांमार्फत दबाव आणतात का ? हे पाहावे लागणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी केलेले हे आरोप आमदार राहुल कुल यांनी फेटाळून लावले आहेत. मात्र आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्यात पारदर्शक कारभार केला आहे, तर मग चौकशीला समोर दाखवण्याची तयारी दाखवून भ्रष्टाचार झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे असे आव्हान या दोन नेत्यांनी दिले आहे.