इंदापूर – महान्यूज लाईव्ह
निरा डाव्या कालव्याला आज सणसर येथील रायतेमळा मोरी येथे अचानक भगदाड पडले. त्यामुळे कालव्यातून संध्याकाळच्या वेळी प्रचंड दाबाने पाणी बाहेर पडाल्याने अंधारात रस्त्यावरून वाहणाऱ्या वेगवान पाण्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली.
आज संध्याकाळी आठच्या सुमारास अचानक रायतेमळा मोरी येथे कालव्यातून पाणी बाहेर पडण्यास सुरवात झाली. सुरवातीला काही काळ हे पाणी कमी दाबाने बाहेर पडत होते. मात्र पाण्याने वेग धरल्याने भगदाड वाढले आणि वाट मिळेल, तसे पाणी कालव्यातून बाहेर पडू लागले.
हा दाब वाढू लागताच स्थानिक नागरिकांचीही धावपळ झाली. दरम्यान स्थानिकांनी पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अभियंता अश्विन पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची कल्पना दिली. त्यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन ३६ क्रमांकाची वितरिका तसेच बारामती तालुक्याच्या हद्दीतील वितरीकांमध्ये पाणी वळवून कालव्यातील पाण्याचा वेग कमी केला व भवानीनगर येथील पाटबंधारे खाताच्या कार्यालयासमोरील कालव्याच्या गेटमधून पाणी अडविण्याची शाखा कार्यालयाला सूचना केली.
अर्थात तेथून किमान पाच किलोमीटर अंतरावर रायतेमळा मोरी असल्याने पूर्ण क्षमतेने वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्यातून रात्री उशीरापर्यंत वेगाने पाणी वाहण्याची भिती असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्यास सुरवात केली.
दरम्यान हे पाणी वाढून सणसर- रायतेमळा रस्त्याने वाहत होते. हे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन तसेच उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सणसरमधील स्वयंसेवकही रात्री अंधारात मदतकार्य करीत होते.