बारामती – महान्यूज लाईव्ह
गेली १७ वर्षे शारदानगरमध्ये अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाकडून जागतिक महिला दिन साजरा होतो.. तो फक्त महिलांना एकत्र करून साजरा होत नाही, तर राज्यभरातील वर्षभर वेगवेगळ्या कामांमुळे नावारुपाला आलेल्या ति
ला सन्मानित केले जाते.. अगदी माहेरी खणानारळाने ओटी भरावी असाच तो प्रफुल्लित, रोमांचित, भावनिक करणारा हा क्षण असतो.. यंदा राज्यभरातील २१ जणींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
शारदानगरच्या अप्पासाहेब पवार सभागृहात झालेल्या या शारदा सन्मान सोहळ्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी महिलांचा संस्थेच्या वतीने ‘शारदा’ सन्मान पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमास बारामती, इंदापूर, पुरंदर, दौड, फलटण, सोलापूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणाहून 850 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. गेली ५५ वर्षे महिला सबलीकरणासाठी झटणाऱ्या व महिला सक्षमीकरण हाच उदात्त हेतू ठेवून काम करणाऱ्या या संस्थेने केलेल्या आजवरच्या कामाची माहिती दिली.
त्या म्हणाल्या, १६ वर्षे झालेल्या भीमथडी जत्रेने उत्पादक ते ग्राहक हा दुवा साधण्याचे काम केले. दरवर्षी या भीमथडी जत्रेमध्ये 22 ते 23 जिल्हे आणि सात ते आठ राज्यातून महिला सहभागी होतात. शारदानगरच्या शैक्षणिक संकुलामध्ये मोफत महिला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रालाही आता १७ वर्षे पूर्ण झाली. येथेही आर्थिक अडचणी असलेल्या, तळागाळातून आलेल्या मुलींना प्रवेश दिला जातो व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी दिली जाते.
त्याचबरोबर शारदा महिला संघ हे महिला बचत गटांसाठी गाव तेथे महिला उद्योजक ही संकल्पना घेऊन काम करत आहे व महिला बचत गटांना शारदा महिला संघ पतसंस्थेतून कर्ज वाटप करणे व महिलांना प्रशिक्षण देणे हे काम करत आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये एक पिढी कमावते आणि दुसरी पिढी घालवते अशी अवस्था दिसून येते. त्यामुळे पालकत्वाची खूप मोठी जबाबदारी ही पालकांवर आहे. पाल्यांना कोणत्या वयात काय हवे, हे माता भगिनींना समजणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना गरज असेपर्यंत आणि योग्य पद्धतीने पालकत्व देण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
आज झालेल्या २१ जणींच्या शारदा सन्मान सोहळ्याकरीता सौ. राजश्री जाधव वाखारी चौफुला, सौ.करुणा नवलकर मालाड, सौ नंदाताई भुजबळ (शिक्रापूर -शिरूर), सौ लता तायडे (किवळे पुणे), सौ. विजयालक्ष्मी शिवणगावकर (बाणेर पुणे), श्रीमती. सविता कुंभार (सिंहगड रोड पुणे), सौ. सोनाली पाटणकर (मुंबई), सौ. राजश्री राजगुरू (निमगाव केतकी), कु. रेणुका कड (औरंगाबाद).
सौ. शारदा कुंजीर (उरुळी कांचन), सौ.शिल्पा शेटे (खारघर- मुंबई), सौ. सुनीता नागरे (अंधेरी पूर्व मुंबई), कु. तपस्वी गोंधळी (अलिबाग, रायगड), डॉ. अनुष्का शिंदे (नारायणगाव), सौ. मनीषा राऊत (बुलढाणा), सौ. परवीन पठाण (निरावागज बारामती), सौ. चांगुना पाथरकर (खांडज बारामती), सौ. कल्याणी शिंदे (नाशिक), सौ. श्रद्धा ढवाण ढोरमले (अहमदनगर), सौ कमल वाघेला (शारदानगर बारामती) यांचा समावेश होता.
सत्कारमूर्तींचा सन्मान सोहळा संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांच्या हस्ते ‘शारदा’ सन्मानपत्र देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते व वर्षा पटणे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार गार्गी दत्ता यांनी केले.