आमदार कुल यांचे विरोधक आक्रमक! आमदार कुल यांचे भाजपमधून निलंबन करा नामदेव ताकवणे यांची मागणी! तर माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, खासदार संजय राऊत यांचे आरोप योग्य आहेत, चौकशी झालीच पाहिजे!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तथा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ विशेषत: भाजप आमदार आणि विधिमंडळ हक्कभंग समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल कुल यांना टार्गेट केले.
राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यहार करत आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशीची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यभर खळबळ उडाली, मात्र इकडे दौंड तालुक्यात हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे. तालुक्यात काहींसाठी अगदी दुखवटा तर काहींना हास्याच्या उकळ्या फुटल्या असल्याचे चित्र पहायला मिळाले.
मात्र संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नाला तोंड फुटले हे मात्र नक्की. आज दिवसभर भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या आवारात आमदार राहुल कुल यांचे समर्थक शेतकरी सभासद एकत्र आले.
त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सांगत कारखान्याची बदनामी करत असल्याचा निषेध केला. तर दुसरीकडे त्याच ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम व विकास सोनवणे यांनी कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे हे सांगत याची चौकशी करण्याची मागणी केली.
अशातच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांना घरचा आहेर दिला. भाजपने फक्त एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निदर्शनास आले, म्हणून थेट राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना पदाचा राजीनामा घेतला होता, जर भाजप राष्ट्रीय अध्यक्षांना राजीनामा देण्यास भाग पाडत असेल, तर आमदार किस झाड की पत्ती म्हणत ताकवणे यांनी थेट राहूल कूल यांनाच लक्ष्य केले.
भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी कुल यांना आमदारकी पदावरून निलंबित करावे अशी मागणी केली, तर कुल यांचे राजकीय विरोधक माजी आमदार व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष थोरात यांनीही संजय राऊत यांनी केलेले आरोप योग्य व तथ्य आहेत हे सांगत या भ्रष्टाचाराची नि:पक्षपणे चौकशी झाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी संचालक नामदेव ताकवणे म्हणाले की, भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समिती मार्फत मागील दोन वर्षांपासून कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देत आहे, आजही तो संघर्ष चालू आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असून माझ्यावर तुम्ही भाजपचे असून भाजपच्या आमदाराला विरोध का करता अशी टीका केली जात आहे , मात्र ही लोकशाही आहे.
भाजप आमदार आहे म्हणून भ्रष्टाचार करण्याचा परवाना राहुल कुल यांना दिला आहे का? भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे हा कारखाना भ्रष्टाचारमुक्त चालविण्याची नैतिक जबाबदारी आमदारांची आहे. वीस वर्ष राहुल कुल हे कारखानाचे अध्यक्ष आहेत, मात्र त्यांनी कारखाना वाचवण्यासाठी प्रामाणिक योगदान दिले नाही, मात्र तो धुण्यामध्ये जास्त योगदान दिले.
५०० कोटींची उलाढाल असलेल्या कारखान्याची सर्वसाधारण सभा अवघ्या तीन मिनिटात संपवली जाते. मात्र अध्यक्ष त्यांचे प्रास्ताविक अगदी दिड दिड तास करतात, त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता या नात्याने भारतीय जनता पार्टीकडे ही मागणी केली आहे की, राहुल कुल यांना आमदार पदावरून निलंबित करावे आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची निःपक्ष चौकशी करावी. सभासदांच्या मालकीच्या कारखाना भ्रष्टाचारापासून वाचवून बँकेचे पैसे वसूल करून बँकेच्या कचट्यातून कारखाना वाचवावा. अशीही मागणी नामदेव ताकवणे यांनी केली.
दुसरीकडे भाजप आमदार राहुल कुल यांचे राजकीय विरोधक असलेले माजी आमदार व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले की, खासदार संजय राऊत यांनी भीमा सहकारी कारखान्याच्या भ्रष्टाचारावर जे आरोप केले आहेत ते योग्य आणि रास्त आहेत.
पुणे जिल्हा बँकेचे व भीमा सहकारी कारखान्याचे १९७९ पासून संबंध आहेत, परंतु गेले पाच सात वर्षांपासून कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्याकडे आम्ही जिल्हा बँकेचे थकीत १७९ कोटी रुपये थकबाकी मिळावी, यासाठी वारंवार पत्रव्यवहार करत आहोत, मात्र वारंवार सांगूनही आज देतो उद्या देतो असे सांगत राहीले. अगदी पैसे दिल्याशिवाय कारखाना सुरू करणार नाही असा शब्द दिला, मात्र त्यांनी आजपर्यंत कोणताही शब्द पाळला नाही.
संजय राऊत यांनी आज केलेले सर्व आरोप हे खरे आहेत, एका ट्रॅक्टरवर पाच – पाच बँकांचे कर्ज काढले आहे आणि प्रत्येक बँकेला हमीपत्र दिले आहे की, कुठल्याही बँकेचे कर्ज घेतले नाही, इथेच तो भ्रष्टाचार आहे का नाही हे सिद्ध होत आहे. याशिवाय इतर गैरव्यवहाराची चौकशी केली, तर भ्रष्टाचार झाला का नाही हे उघड झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे ईडी आणि सीबीआय किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणा मार्फत भीमा पाटस सहकारी कारखान्याची चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.
आमदार राहुल कुल यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले, ते पत्रकारांशी बोलताना मुंबईत म्हणाले की, भिमा – पाटस साखर कारखान्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप हा राजकीय आकसातून आहे. गेली २२ वर्षांपासून कारखान्याचा अध्यक्ष आहे. माझी हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच हा आरोप का झाला ?
खासदार राऊत यांना कारखान्याबाबत पूर्ण माहिती नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी कारखान्यावर आरोप केलेले आहेत. भीमा पाटस कारखाना सुरू ठेवण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे प्रयत्न करीत असताना वेळ आल्यावर माझी वैयक्तिक मालमत्ता ही बँकांकडे गहाण ठेवून पैसे उपलब्ध करून कारखाना चालवला आहे. ही वस्तुस्थिती असताना केवळ राजकीय आकस मनात ठेवून खासदार राऊत हे आरोप करीत आहेत असे कुल यांनी सांगितले.