मुंबई – महान्यूज लाईव्ह
ईडी, सीबीआय नेमके विरोधकांच्या घरावरच धाडी कशा टाकतात? मनीष सिसोदिया, तेजस्वी यादव या्ंच्यापासून महाराष्ट्रातील सदानंद कदमांपासून हसन मुश्रीफांपर्यंत सुरू असलेल्या या कारवायांमध्येच आज अचानक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा लेटरबॉम्ब टाकला. पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप करीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा अशी मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करत आज सकाळीच राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या असाही सल्ला खासदार राऊत यांनी केला आहे.
सोमय्या यांच्या कार्यालयात तक्रारदार हे प्रकरण घेऊन गेले, मात्र किरीट सोमय्या या भ्रष्टाचारावर मूग गिळून गप्प बसले, जनतेच्या पैशाची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे, हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण हे सरळसरळ ५०० कोटींचे मनी लॅंडरींग असल्याचा आरोप करीत राऊत यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचे प्रकरण चर्चेत आहे, तेथे तपास यंत्रणेच्या धाडी पडत आहेत, मात्र त्यापेक्षा भयंकर प्रकरण तर भिमा पाटस कारखान्याचे आहे, या कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे, मात्र या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
राऊत यांनी नेमका काय आरोप केला आहे?
खासदार राऊत यांनी या संदर्भात तीन पानी पत्र जोडले असून यामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याचे अनामत येणे माध्यमातून आणि ऊस तोडणी वाहतुकीच्या कारणासाठी एकाच वेळी एकाच कारणासाठी एकापेक्षा अनेक बँकांचे कर्ज काढून 210 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून सदर रकमेचा अपहार झालाय असा आरोप केला आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
यामध्ये राऊत यांनी नमूद केलेल्या मुद्द्यानुसार शासकीय लेखा परीक्षण अहवाल आणि कारखान्याचे वार्षिक अहवाल यांची सखोल छाननी केली असता या कारखान्याचे एकूण सभासद 49 हजार 495 असून त्यांच्याकडे 52 हजार 656 शेअर्स आहेत. कारखान्याने सन 2010 मध्ये 45 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्लांट उभारला. हा कारखाना स्पिरीट, इथेनॉल, बायोगॅस आणि कंपोस्ट खताचे उत्पादन करतो. कारखान्याने 19.5 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प सुद्धा स्थापन केलेला आहे.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. संचालक मंडळाने 2016 -17, 2019- 2020- 21 आणि 2021- 22 या वर्षात कारखाना गळीत हंगाम बंद असताना अनामत येणे रकमेच्या माध्यमातून 128 कोटी 14 लाख 495 रुपये आणि खुल्या साखर याची परस्पर विक्री करून 32 कोटी 11 लाख 2 हजार 416 रुपये असे एकूण 160 कोटी 25 लाख 3 हजार 911 रुपये इतक्या रकमेचा कथित आर्थिक गैरव्यवहार करून अपहार केल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
खासदार राऊत यांनी अचानक हा लेटरबॉम्ब टाकला असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार अॅड. राहूल कुल नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. या पत्रावर राहुल कुल यांनी तातडीने प्रतिक्रिया नोंदवलेली नाही मात्र त्यांच्याकडील खुलासाची उत्सुकता आहे.
दरम्यान राज्यभरातील साखऱ कारखाने यानिमित्ताने विरोधक व सत्ताधारी यांच्या नजरेत येण्याचीही चिन्हे असून विरोधकांच्या ताब्यातील साखर कारखान्यांची चौकशी सत्ताधाऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याने करावी व सत्ताधारी आमदारांच्या ताब्यातील साखर कारखान्यांची विरोधकांच्या तिसऱ्या डोळ्याने करावी अशीच अपेक्षा सामान्य ऊस उत्पादकांनी केली, तर त्यात नवल वाटायचे काहीच कारण नाही. मात्र यानिमित्ताने भिमा पाटस कारखाना आरोपाच्या रडारवर आला हे नक्की..!