दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा रविवारी ‘काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी सकाळी आठच्या सुमारास पोहचले. त्यानंतर बगाड्या दिलीप दाभाडे यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली.
बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात येऊन त्याला पारंपरिक पध्दतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधण्यात आले होते. एरवी बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी साडेअकराच्या सुरूवात होते परंतु यावेळी उशिरा बगाड सुरु झाले.
त्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई- पाचवड रस्त्यावर बावधन फाटयावर साडेपाचच्या सुमारास पोहचले. तेथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने, रसाची गुर्हाळे, देवांच्या फ्रेमची, कटलरीची दुकाने थाटण्यात आली होती. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले.
बगाड गाड्यास शेतातून जाताना एकावेळी 12 बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर 4 बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. ग्रामस्थांनी बगाडासाठी बैल धष्टपुष्ट केले होते. यासाठी शेतकर्यांनी संपूर्ण वर्षभर आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देवून तयार केले होते. हे खिलारी बैल देखील पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात.
दरम्यान बगाड गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व रूग्णवाहिका तैनात करण्यात आली होती.
वाई विभागचे महावितरणचे अविनाश खुसपे आपल्या टीम समवेत जातीने लक्ष ठेवून हजर होते. वाई नगरपरिषदेचे अग्निशमक बंब बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते. रात्री उशिरा 8 च्या सुमारास बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.
बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाडयाच्या पुढे व पाठीमागे ट्रॅक्टरवर लाउडस्पीकरची सोय करून शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राजू कदम, पोलीस पाटील अशोक भोसले, मदन भोसले, विलास पिसाळ, प्रतापराजे भोसले आदी ध्वनिक्षेपकांवरून बगाडाबाबत सुचना देत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक कृष्णराव पवार, स्नेहल सोमदे यांच्यासह 60 पोलीस कर्मचारी, एक जलद कृतीदलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. बावधन बगाडाच्या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.