दौंड : महान्यूज लाईव्ह
पाच वर्षे प्रेमसंबंध असूनही प्रियकराने अचानक लग्न करण्यास नकार दिला, म्हणून नैराश्य आलेल्या युवतीने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना दौंड येथे घडली असून दौंड पोलिसांनी या संदर्भात निखिल साबळे (रा. मोरेवस्ती ता. दौंड) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत दौंड शहरातील युवतीचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी मुलीच्या भावाने दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून निखिल साबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी सहाच्या दरम्यान उघड झाली. ही युवती दौंड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणीच्या प्रयोगशाळेत काम करत होती. काल रात्री तिने तिच्या मावसभावाकडे आपले व निखिलचे प्रेम संबंध असून निखिल याच्याशी मी प्रेमविवाह करणार असल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर मावसभावाने तिला तिच्या घरी आणून सोडले. ती नैराश्यावस्थेत असल्याने भावाने व त्याच्या आईने रात्री तिची समजूत घातली. यावेळी तिने माझे निखिल याचेसोबत गेले 5 वर्षापासुन प्रेमसंबंध आहेत. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. पण तो माझ्यासोबत लग्न करण्यास नकार देत आहे. त्यामुळे मी त्याला वारंवार माझ्या सोबत लग्न कर असे म्हणते, परंतु तो लग्न करण्यास तयार नाही असे सांगून माझी जगण्याची इच्छा राहीली नाही असे सांगितले.
आज सकाळी लवकर कोणीतरी दरवाजा अचानक बंद केल्याने तिच्या भावास जाग आली. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळे त्याने शेजारील एका व्यक्तीस दरवाजा उघडण्यास सांगितले. दरवाजा उघडल्यावर त्याने बहिणीचा शोध घेतला, मात्र ती आसपास दिसली नाही. त्यामुळे त्याने टेरेसवर जाऊन पाहिले असता टेरेसवरून खाली पाहिल्यानंतर ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आली. त्यामुळे तिला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेले, मात्र औषधोपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.