भिगवण – महान्यूज लाईव्ह
रक्त सळसळतंय म्हणून जबरदस्त वेगाने गाड्या चालवायच्या असं काही नाही.. आज पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणनजिक दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली जवळ एक भीषण अपघात झाला. यामध्ये वेगात स्विफ्ट कार चारवेळा पलटली आणि दोन युवक ठार तर तीन जण जखमी झाले.
मारूती स्विफ्ट गाडीच्या अपघातात मृतामध्ये एक तरुण तक्रारवाडी (इंदापूर, पुणे) येथील वैभव विठ्ठल जांभळे (वय २४ रा.तक्रारवाडी ता.इंदापूर जि.पुणे) असून दुसऱ्याचे नाव प्रतीक पप्पू गवळी (वय २२ वर्षे, मोशी तालुका हवेली पुणे ) आहे.
यातील वैभव हा व्यवसायिक असून तो टेलरकाम करीत होता. तर प्रतिक हा स्वामीचिंचोली येथील दत्तकला संस्थेत फार्मसी मध्ये शिकत होता. हा अपघात अतिवेगात असलेल्या स्विफ्ट कारवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान या अपघातात असिफ बशीर खान(वय २२ वर्षे ) सुरज राजू शेळके(२३ वर्षे दोघे रा. भिगवण ता.इंदापूर ) आणि ऋषिकेश बाळासाहेब येळे (२२ रा. इंदापूर) हे तिघे जखमी झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
हे पाचही जण भिगवणकडून पुणे बाजूकडे लाल रंगाच्या स्विफ्टकार मधून निघाले होते. ही कार (नं. एम एच ४२ एएक्स ४७२९) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास हॉटेल पंचरत्न जवळ येताच कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली. या घटनेचा पुढील तपास रावणगाव पोलिस करीत आहेत.