दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
अनेकदा ग्रामदैवतेच्या यात्रेतील नारळाचा मान कोणी मिळवायचा त्यावरून बरीच रस्सीखेच, स्पर्धा असते.. हा सारा श्रध्देचा भाग असतो.. वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा राज्यात सुपरिचित आहे. या बगाड यात्रेत बगाड्या म्हणून मान मिळण्यासाठी नवस बोलतात हेही अनेकांना माहित आहे.. त्यामुळेच जेव्हा ३० वर्षानंतर कुटुंबात बगाड्याचा मान आला, तेव्हा पुणेकर दिलीप दाभाडे यांच्या कुटुंबाला आनंदाला पारावार उरला नसेल तरच नवल..
बावधन यात्रेतील बगाड्या होण्याचा बहुमान दिलीप शंकर दाभाडे- पुणेकर (राहणार वाकेश्वर बावधन) यांना मिळाला. बगाड्याचा मान मिळालेल्या दिलीप दाभाडे यांचे थोरले बंधू दिनकर दाभाडे यांनी तीस वर्षांपूर्वी काळभैरवनाथाला घरात सुख शांती व चांगले आरोग्य लाभावे यासाठी नवस केला होता.
नवसकरी दिनकर हे दहा वर्षे नवसास बसत होते. दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्याने धाकटा भाऊ बगाड्या दिलीप दाभाडे गेली वीस वर्ष भावाने केलेला नवस फेडण्यासाठी कौल लावण्यास बसत होते. यंदा परिसरातील 60 नवसकर्ते कौल लावण्यास बसले होते.
त्यात दिलीप दाभाडे यांचा 28 वा नंबर होता. नाथाने त्यांच्या बाजूने कौल दिल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा बहुमान दिलीप दाभाडे यांना मिळाला. ते सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी आहेत. या दाभाडे कुटुंबाला पुणेकर म्हणून ओळखले जाते.
भावाने केलेला नवस भावाच्या पश्चात दिलीप दाभाडे यांनी नवस फेडण्यासाठी वीस वर्षे सातत्याने नाथाची सेवा केली. ते भैरवनाथाची श्रद्धा भक्तीभावाने पूजा करतात. त्यांची नाथावर अपार श्रद्धा आहे. यंदाचा बगाड्याचा बहुमान मिळाल्याने दाभाडे पुणेकर आनंदी व उत्साही होते.