दौंड – महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव हद्दीत असणाऱ्या कानगाव – मांडवगण फराटा रोडलगत असलेल्या हाॅटेल विसावा याठिकाणी बेकायदा बिअर बारवर यवत पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला असला तरी मुख्य बिअर बार चालक व मालक यांच्यावर कारवाई झाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून कानगाव- मांडवगण रोडला असलेल्या हॉटेल विसावा याठिकाणी बेकायदा बियर , देशी विदेशी दारू याची खुलेआम विक्री केली जात होती.
या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीवर ग्रामस्थांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केली होती. पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी त्यावेळी छापा टाकून मद्यसाठा जप्त करीत गुन्हा दाखल करून कारवाईही केली होती.
मात्र संबंधित मालकाने पुन्हा याठिकाणी देशी विदेशी दारूची विक्री सुरू केली होती. पोलिसांनी नुकताच या ठिकाणी छापा टाकून कारवाई करत चालक संजय दत्तात्रय फडके (वय ३७ रा.कानगाव, ता.दौंड, जि.पुणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय टकले यांनी फिर्याद दिली असून पोलीस हवालदार संदीप कदम हे तपास करीत आहेत.