विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती – वाघळवाडी गावांमधील अंबामाता महिला ग्रामसंघ यांनी महिला दिनाचे औचित्य साधत आपल्या गावात असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना २२० महिलांनी प्रत्यक्ष कारखाना कसा चालतो हे पाहिले.
गावातील ज्या महिला शेतकरी आहेत, ज्या स्वतःही शेतात राबतात, मात्र त्यांनी पिकवलेला ऊस कशा प्रकारे गाळप होतो व त्यापासून कशी साखर तयार होते हे आजवर पाहिले नव्हते, तो पाहण्याची त्यांनाही उत्सुकता होती.
त्यांनी आजपर्यंत कधीच सोमेश्वर साखर कारखाना पाहिलेला नव्हता. आपण एवढ्या कष्टाने ऊस पिकवतो पण त्या पिकाची प्रक्रिया कशी होते हे माहित नव्हतं. फक्त साखर तयार होते एवढच माहीती होतं.
पण ती साखर कशी व कशा पद्धतीने तयार केली जाते. कारखान्यामध्ये असलेले कर्मचारी कारखान्यात काय काम करतात हे सर्व जाणून घेण्यासाठी त्या सोमेश्वर साखर कारखान्यात पोचल्या. या महिलांनी कारखाना पाहून समाधान व्यक्त केले.
आजपर्यंत आम्ही कधीच कारखाना बघितला नव्हता. तो कारखाना वाघळवाडीतील अंबामाता महिला ग्राम संघ बचत गटाच्या माध्यमातून पाहण्यास मिळाला अशी प्रतिक्र्या व्यक्त केली. अंबामाता मंदिर वाघळवाडी या ठिकाणापासून महिलांनी रॅली पद्धतीने सर्व महिला चालत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आल्या.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, अधिकारी निंबाळकर, प्रशांत कदम यांनी या महिलांना माहिती दिली. महिला दिनाचे औचित्य साधत माजी सरपंच व अंबामाता महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा नंदा सकुंडे, राष्ट्रवादीच्या बारामती तालुका महिला सरचिटणीस सुचिता साळवे व उद्योजिका घाडगे यांनी नियोजन केले.
यावेळी वाघळवाडीचे उपसरपंच गणेश जाधव व सदस्य तुषार सकुंडे, गावातील सर्व बचत गटांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व बचत गटातील महिला भगिनी सदस्य उपस्थित होते.