मुंबई – महान्यूज लाईव्ह
माजी मंत्री व शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आ्मदारांबरोबर गुवाहाटीत गेलेले बच्चू कडू आता पुन्हा एकदा गुवाहाटीच्या रडारवर आले आहेत. मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधीमंडळात कडू यांनी गुवाहाटीत कुत्रे नऊ ते दहा हजारांना खरेदी करतात अशी माहिती दिल्यानंतर हास्यकल्लोळ झाला, मात्र आता तेच वक्तव्य आसामसाठी स्वाभीमानाला ठेच पोचवणारे ठरले आहे.
आज आसाम विधीमंडळात विरोधक कॉंग्रेसच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली. आसामचा अपमान करणाऱ्या कडूंवर आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली असा प्रश्न विचारत राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख का झाला नाही असा सवाल विचारला आणि विधीमंडळातील वातावरण गरम करून टाकले. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना अभिभाषणही अर्ध्यावर सोडून जावे लागले.
कडू काय म्हणाले होते?
मध्यंतरी राज्याच्या विधीमंडळात भटक्या कुत्र्यांचा विषय समोर आला, तेव्हा बच्चू कडू यांनी यात भाग घेताना आसाममध्ये कु्त्र्यांचे मांस खाल्ले जाते असा उल्लेख करीत भटकी कुत्री गुवाहाटीत सोडली पाहिजेत, आसाममध्ये कुत्र्यांच्या मांसाला मागणी आहे असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्यामुळे राज्यात मोठी चर्चा झाली. गुवाहाटीत गेलेल्या बंडखोर आमदारांनाच कडू यांनी उपरोधिकपणे हा टोला मारल्याचीही सुरवातीला चर्चा झाली. मात्र आता ही चर्चा कडू यांच्यावर उलटण्याची चिन्हे आहेत.