पुणे – महान्यूज लाईव्ह
मासिक पाळी सुरू असताना सासू व दिराने सूनेचे मासिक पाळीचे रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकले. त्यावरून बीडच्या २७ वर्षीय महिलेने सासरच्या पाच जणांविरोधात फिर्याद दिली असून विश्रांतवाडी पोलिसांनी जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तो बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मात्र या अघोरी प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे. त्याची धग विधीमंडळापर्यंत पोचली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात आरोपींवर कठोरात कठोर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
पुरोगामी राज्याला हादरा देणारी ही घटना पुण्यात घडली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ही घटना घडली असून या महिलेचा प्रेमविवाह झाला आहे. तिचे सासर बीडमध्ये आहे. बीडला सासरी असताना मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा करून ते रक्त मांत्रिकाला ५० हजार रुपयांना विकल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले असून आपल्यासोबत अनैसर्गिक अत्याचार झाल्याचेही या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
या महिलेच्या फिर्यादीनुसार सागर ढवळे, अनिता ढवळे, बाबासाहेब ढवळे, दीपक ढवळे, विशाल तुपे, रोहन मिसाळ, महादेव कणसे ( सर्व रा. बीड ) या्ंच्याविरोधात पोलिसांनी अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारीरीक छळ, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास फौजदार शुभांगी मगदूम करीत आहेत.