सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
तावशीचा १७ कोटींचा पूल म्हणजे इंदापूर तालुक्यासाठी जणू राष्ट्रीय संपत्तीचा विषय बनला आहे, कारण हा पूल नक्की कोणी मंजूर केलाय? म्हणजे राष्ट्रवादीने की भाजपने? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. कारण आधी राष्ट्रवादीने दावा केला, मग भाजपने यासंदर्भातील हर्षवर्धन पाटील यांची पत्रे प्रसारमाध्यमांपुढे मांडली.

मात्र आता जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी थेट ६ सप्टेंबर २०२२ चेच पत्र उघड केले असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या कामाची शिफारस केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे, शिवाय त्याचा सर्वेदेखील १३ मे २०२२ रोजीच झाल्याचा दावा सचिन सपकळ यांनी केला असून भाजपचा खोटारडेपणा यातून अगदी ठळक दिसून येतो असा आरोप केला आहे.

दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी यासंदर्भात आम्हीच अगोदर पूलाची मागणी केली होती अशी पत्रे जाहीर केली. यातील एक पत्र हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे तर एक पत्र सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांना दिलेले होते. हर्षवर्धन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण या्ंच्याकडे ६ फेब्रुवारी २०२३ रोजी, चंद्रकांत पाटील यांच्याकडे २ फेब्रुवारी २०२३ रोजी मागणी केली होती. यामध्ये अनेक पुलांच्या कामांची मागणी असलेली यादी यामध्ये समाविष्ठ होती.
त्यातच माजीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल आपल्याच पाठपुराव्यानुसार या १७ कोटींच्या पुलाच्या कामास मंजूरी मिळाल्याचा दावा केला. भरणे यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थसंकल्पात तरतूदीसाठी यावर तातडीने निर्णय घेण्याकरीता पत्र दिले होते. व फडणवीस यांनीदेखील त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसाठी शेरा मारला असून याचा समावेश करण्याची सूचना केली आहे.
साहजिकच या कामाला मंजूरी मिळताच भरणे यांनी दावा केला, मात्र आज भाजपच्या वतीने भरणे यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करीत हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच ही कामे मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला.
आता जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी पुन्हा एक लेटरबॉम्ब फोडून राष्ट्रवादीनेच या प्रश्नाची सुरवात केली, तो प्रश्न मा्ंडला, त्याचा सर्वे करून घेतला आणि या कामाचे श्रेय राष्ट्रवादीचेच असल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजीचे अजित पवार यांचे पत्रच प्रसारमाध्यमांकडे दिले.
६ सप्टेंबर २०२२ रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना नाबार्ड-२८ अंतर्गत आसू, तावशी, उदमाईवाडी, थोरातवाडी हा रस्ता प्रजिमा १९४ किमी ०-०० येथे निरा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी १७ कोटींची मागणी केल्याचे पत्र दिले होते.
त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी उचित कार्यवाहीसाठी सचिवांना मंत्र्यांनी हे पत्र पुढे पाठविल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात सचिन सपकळ यांनी भाजपवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.