सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
नीरा नदीवरील इंदापूर तालुक्यातील तावशी व फलटण तालुक्यातील आसूला जोडणाऱ्या पूलासाठी १७ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचा दावा आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला, त्यानंतर लागलीच भाजपने आमदार भरणे यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करीत हा पूल आम्हीच मंजूर केला, आमचेच सरकार असल्याचे सांगत आता कामे आमची असा दावा भाजपने केला आहे

इंदापूर तालुक्यातून जाणा-या नीरा नदीवरील तावशी आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसू या दोन गावांना जोडण्याकरिता पूलाची आग्रही मागणी आपण चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती, या मागणीची दखल घेत गुरुवारी ०९ मार्च रोजी जाहिर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये या पूलासाठी १७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

हा नवीन पूल निर्माण झाल्यास शेतकऱ्यांची ऊस वाहतूक, यासह अन्य वाहतूक सुलभ होऊन दळणवळण सोपे होणार आहे. या पुलामुळे तावशी, उदमाईवाडी, थोरातवाडी, कुरवली, उध्दट, घोलपवाडी आदी भागासह फलटण तालुक्यातील अनेक गावांचा दळणवळणाचा कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे

दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे खोटे बोलतात असे सांगत नीरा नदीवरील तावशी पुलास हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच 17 कोटींचा निधी मिळाल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी केला आहे.

पुलाच्या मागणीची फेब्रुवारी महिन्यातील 3 पत्रे दाखवित भाजपने भरणेंचा दावा खोटा असल्याचे सांगत खोटे श्रेय घेणे बंद करण्याचा सल्ला दिला. तब्बल 3 पत्रे भाजपने दाखवून आमदार भरणेंचा दावा खोडत आता आमदार भरणे यांनी खोटे बोलणे बंद करावे असा सल्ला दिला आहे.तर शिवसेना-भाजप सरकारच्या कामाचे श्रेय विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घेणे हा राज्यातील मोठा विनोद आहे असा टोला भाजपाने लगावला. दरम्यान इंदापूर तालुका भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
भरणेंचे २० फेब्रुवारीचे पत्र, हर्षवर्धन पाटलांचे १० फेब्रुवारीचे पत्र..!
भाजपने अगोदर ही मागणी केल्याचा दावा शरद जामदार यांनी केला आहे. भाजपने सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण या्ंच्याकडे ६ फेब्रुवारी २०२३ रोजी, चंद्रकांत पाटील यांच्याकडे २ फेब्रुवारी २०२३ रोजी मागणी केली होती. या पत्रावर लिखित स्वरुपात तारखा टाकलेली पत्रे आज प्रसारमाध्यमांकडे भाजपने दिली. तर दुसरीकडे दत्तात्रेय भरणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २० फेब्रुवारी रोजी या पुलाच्या कामाची मागणी केलेले पत्र राष्ट्रवादीने दाखवले असून यामध्ये फडणवीस यांनी या कामाचा समावेश करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्याचेही दिसून येत आहे.
कोणाची पत्रे अगोदरची?
दरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या पत्राकडे लक्ष वेधले. पाटील यांची मागणी पूर्णतः मुद्रीत केलेली आहे, मात्र तारखा पेनाने टाकल्या आहेत, तर भरणे यांच्या पत्रावरची तारीख टाईप केलेली आहे. त्यामुळे सरकार असल्याचा गैरफायदा घेऊन आम्हीच मागणी अगोदर केली असल्याचे भाजप आता सांगत असल्याची टिका राष्ट्रवादीने केली आहे. दुसरीकडे पाटील यांनी खूप कामांची मागणी केली, मात्र भरणेंनी फक्त एकाच कामाची मागणी केली, तेच काम मंजूर झाले आहे असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नक्की कोणाचे पत्र अगोदर यावर अजून येत्या काळात वादविवाद होण्याची चिन्हे आहेत.