दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – राज्यासह परराज्यातही वाई तालुक्यातील ओझर्डे गावची सोंगं परिचित आहेत. हा सोंगांचा महिना व रुढी आणि परंपरा असलेला इतिहास येथील गावकरी पिढ्यानपिढ्या सांभाळत आहेत. रुजवत आहेत. येत्या ११ व १२ मार्च रोजी हा महोत्सव होतोय. यानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी शांतता बैठक घेतली.
ओझर्डे गावात ३५० वर्षापासून चालत आलेली ही सोंगांची परंपरा कोणतेही गालबोट न लागता पार पडतात. आताही ११ मार्चच्या रात्रीपासून १२ मार्चच्या पहाटेपर्यंत हा सोंगे महोत्सव होणार आहे.
या वेळी वाई तालुक्यासह, जिल्यातील व अगदी परराज्यातील हजारोंच्या संख्येने लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात त्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी भुईंज पोलीसांनी बैठक आयोजित केली होती.
भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी या बैठकीत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांनी सोंगे उत्सवातील प्रमुख स्पर्धक असलेल्या साळआळी आणी माळआळी येथील प्रमुखांसह तरुण वर्गाशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
पारंपारिक पद्धतीने सोंगे काढताना गावची कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी उत्सवातील जबाबदार कार्यकर्त्यांनी घ्यावी. गावच्या मुख्य रस्त्यांवरुन सोंगांची वाहने जात असताना ,वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना त्याचा त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच सोंगांच्या वाहनांसमोर कोणीही दारु पिऊन नाचकाम करु नये. येथील सोंगांचा इतिहास हा डॉल्बीमुक्त असावा असे आवाहनही गर्जे यांनी केले. यावेळी गावचे सरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक, युवक, पोलिस पाटील व पत्रकार उपस्थित होते.