दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – सुरूर येथील दावजीपाटील मंदीरात घडलेल्या जादूटोणा प्रकरणातील फरारी असलेले आरोपी गजाआड करण्यात तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींच्या गुन्हयातील अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात व आरोपींना गजाआड करण्यास भुईंज पोलीसांना यश आले आहे.
या तपासामुळे ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांच्या तपास पथकावर लोक खुश आहेत. मात्र सुरूरचा परिसर अंधश्रध्देचा अड्डा बनता कामा नये अशी साऱ्यांचीच अपेक्षा आहे.
भुईंज पोलीसांची ही यशोगाथा अगोदर जाणून घेऊ. सुरूर (ता. -वाई) येथे २५ फेब्रुवारी दावजी पाटील मंदीरात संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी एक भाविक आला होता. या भाविकाने मंदीरात सुरु असलेला अघोरी उपचार व गुलालाच्या रिंगणात ठेवलेले साहित्य, लिंबाला टाचण्या टोचून त्यातील रस काढून समोर बसलेल्या अनोळखी इसमाच्या तोंडात ओतून त्याला घाणरेड्या शिव्या देत असल्याचे कृत्य त्याच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिग केले आणि ते भुईंजचे सहायक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांना दाखवले.
गर्जे यांनी तातडीने याची गंभीर दखल घेत जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत चार संशयित मांत्रिकांविरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता .याची तक्रार मनोज सतीश माने यांनी दाखल केली होती.
गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आणि वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. या गुन्हयातील आरोपी हे अनोळखी असल्याने त्यांना पकडणे हे पोलीसांच्या समोर एक आव्हानच होते.
भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे यांनी तातडीने एक विशेष पोलिस पथक तयार केले. या पथकाने दावजी पाटील मंदीरातील तसेच परिसरातील सर्व सी. सी. टिव्ही फुटेज घेवून परिसरातील अनेकांकडे चौकशी केली, परंतु त्या फरार आरोपींना कोणीही ओळखले नाही. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक बाबीवर तपास केला.
मंदीर परिसरातील सातारा पुणे हायवेवर खेड शिवापूर ते आणेवाडी टोलनाका तसेच सुरूर ते वाई आणि वाई ते मांढरदेवी देवस्थान या परिसरातील १०० पेक्षा जास्त ठिकाणचे सी. सी. टिव्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले. सदरचे आरोपी हे पुणे शहरातील बुधवार पेठ येथील असून मुख्य संशयित दिगंबर कोंडिबा शिंदे (वय ५७ वर्षे), सोमनाथ दिनकर पवार (वय ५३ वर्षे) यांना शोधले.
त्या दोघांना बुधवारी ( दि. ८ मार्च रोजी) ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा अधिक तपास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.
गुन्हेगारांनो सावधान! तुमचा कार्यक्रम करेक्ट होणार !
रविवार ( दि. ५ मार्च रोजी) रात्री ११.३० च्या सुमारास भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील एक पूर्व भागातील तर एक पश्चिम भागातील अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा गुन्हा भुईंज पोलीस स्टेशनला दाखल झाला.
या गुन्हेगारांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान भुईज पोलीसांच्या पुढे होते. भुईंजचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या आधारे दोन पथके तैनात केली. त्या दोनही पथकांनी काम फत्ते केले व ४८ तासाच्या आत एक मुरुड (ता.जि. लातूर) येथून तर दुसरी मुलगी औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतानाच आरोपींनाही ताब्यात घेतले.
या गुन्हयाच्या तपासात सातारा जिल्हयाचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाणवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार रत्नदीप भंडारे, पोलीस अमलदार शिवाजी तोडरमल, जितेंद्र इंगुळकर, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, महिला पोलीस रूपाली शिंदे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.