राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : बारामती तालुक्यातील सुपे येथे अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात लाख १४ हजार रुपये रक्कम असलेली ए.टी.एम मशीनच चोरुन नेली. ती एटीएम मशीन रावणगाव- बोरीबेल रस्त्यावरील गटारात टाकून चार चाकी वाहनासह पलायन केल्याची घटना घडली! आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत दौंड पोलीसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली आहेत.
शुक्रवार (दि.१०) पहाटे सुपे येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने तोडून चार चाकी वाहनातून चोरून अज्ञात चोरटे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रावणगाव – बोरीबेल रस्त्यावरून निघाले होते.
पहाटेच्या सुमारास रावणगाव – बोरीबेल घाटात बोलेरो गाडीतून चोरून आणलेले हे मशीन चोरटे गटारात लपवण्याचा प्रयत्न असताना काही ग्रामस्थांनी ते बघितले, ग्रामस्थांना बघताच त्या चोरट्यांनी मशीन तिथेच टाकून पळून गेले.
रावणगाव येथील ग्रामस्थ कुमार चव्हाण, गणेश गावडे, बाळदत्त आटोळे या ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एटीएम मशीन फोडून चोरीचा मोठा प्रयत्न फसला आहे.
ग्रामस्थांनी दौंड पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, गोरख मलगुंडे, भागवत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करीत हे मशीन ताब्यात घेतले. हे मशीन चोरीचा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथील घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, वडगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी भेट देऊन पाहणी केली. दौंड पोलिसांच्या ताब्यातून एटीएम मशीन ताब्यात घेतले असून चोरट्यांनी ते मशीन गॅस कटरने तोडून पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र मशीन न तुटल्याने त्यातील रक्कम तशीच राहिली ५०० रुपयाची एक नोट त्यातून बाहेर निघालेली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.
असा फसला डाव….
रावणगाव – बोरीबेल ग्रामस्थ पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून व्यायाम करीत असताना रस्त्यावरच बोलेरो ( एम.एच १२) अशी पासिंग असणारी गाडी थांबली होती व बाजूलाच गटारात तीन-चार जण एटीएम मशीन झाकत होते हे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थ कुमार चव्हाण, गणेश गावडे व बाळदत्त आटोळे यांनी स्थानिक पत्रकार तानाजी गावडे यांना घेऊन याबाबतची कल्पना दौंड पोलिसांना दिली चार तासात रोखड सह रस्त्याच्या कडेलाच पडलेले एटीएम पोलिसांच्या स्वाधीन झाले.