बारामती -महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचे (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट – पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र) व एम्ब्रियो ट्रान्सफर (IVF) अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन शनिवारी (दिनांक 11 मार्च 2023 रोजी) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.
माजी केंद्रीय कृषीमत्री शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.
सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट किंवा पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र हा देशी गोवंश आणि म्हैस यामधील दूध उत्पादन वाढीचा उद्देश घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजना व टाटा ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेला प्रकल्प आहे.
नेमका कसला आहे प्रकल्प?
बारामतीतील या पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र प्रकल्पामध्ये देशी गोवंशातील गीर आणि साहिवाल व म्हशींमध्ये मुऱ्हा आणि पंढरपुरी या दोन म्हशींच्या जातींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पात सध्या (IVF) एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत ब्राझिलियन आणि भारतीय गीर वासरांची निर्मिती करण्याचे काम चालू केले गेले आहे.
देशी गोवंशाच्या दुध उत्पादन वाढीसाठी व गुणात्मक दर्जासाठी ॲनिमल न्यूट्रिशन, अॅनिमल जेनेटिक्स, डिसीज डायग्नोस्टिक, जनावरांमध्येही एम्ब्रियो ट्रान्सफर (IVF) सुविधेच्या जागतिक दर्जाच्या अधुनिक प्रयोगशाळा या प्रकल्पामध्ये आहेत. संशोधनाव्यतिरिक्त या प्रयोगशाळा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कामी याव्यात या दृष्टीने यांची उभारणी करण्यात आली आहे. पशुखाद्यातील खाद्य घटक तपासणी, विषारी घटक तपासणी, जनावराचे शेण, रक्त, दूध इत्यादी बाबी या प्रयोगशाळेमध्ये माफक दरामध्ये शेतकऱ्यांना तपासून दिल्या जाणार आहेत. सोबतच दुग्ध उत्पादकांना मार्गदर्शन दुग्ध व्यवसाय चालवताना शेतकऱ्यांना अचूक निर्णय घेणे सोपे होण्यासाठी या महत्वाच्या बाबी ठरणार आहेत.
भारत जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश असला तरी भारतीय देशी गाईचे दूधाचे प्रमाण प्रतिदिन प्रति गाय ६ ते ८ लिटर एवढेच आहे. भविष्यकाळामध्ये भारतासमोर अन्नाची समस्या निर्माण होऊ शकते, अशावेळी मानवाच्या अन्नामध्ये प्रथिनासाठी दूध हा प्रमुख स्त्रोत मानला जातो. त्यामुळे संकरित गाईसोबतच देशी गाई आणि म्हशींमधील दुधाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.
मात्र या देशी गोवंशाचे दूध वाढवण्याच्या उत्पादनातील समस्येची काही कारणे आहेत. वैज्ञानिक पद्धतीने खाद्य नियोजनाचा अभाव, चारा आणि पशुखाद्य माफक दरात उपलब्ध नसणे, जास्त संख्येने कमी दूध देणारी जनावरे, अयोग्य पद्धतीने कृत्रिम रेतन , तसेच रेतनाबाबतच्या बाबी नोंदी न ठेवल्यामुळे उद्भवणारी इन ब्रीडिंगची समस्या, रेतनासाठी आवश्यक असणाऱ्या उच्च वळूंची अनुपलब्धता, जास्तीचा भाकड काळ, गाभण राहण्याच्या समस्या, अपुरे तंत्रज्ञान आणि तज्ञ मनुष्यबळाचा अभाव या गोष्टी महत्वाच्या ठरत आहेत. त्यासोबतच खाद्य तपासणी, रेशन बॅलेंसिंग, रोगनिदान आणि गर्भधारणा निदान या तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर या सर्व बाबींमुळे देशी दूध उत्पादन आणि त्याची गुणवत्ता कमी मिळते त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशु-पोषण, पुनरुत्पादन, पशुरोग निदान, खाद्य तपासणी आणि विस्तार सेवा उपलब्ध करून देऊन दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढवणे. आणि पर्यायाने शेतकरी दुग्ध व्यवसायिकांचा नफा वाढवणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
या प्रकल्पात दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापना करता शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि आधुनिक प्रात्यक्षिकाचा अनुभव देण्यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त अशा डेअरी फार्मची स्थापना करणे व चांगल्या दुधाळ जनावरांची उत्पत्ती करण्यासाठी दर्जेदार अशा कृत्रिम रेतन व एम्ब्रियो ट्रान्सफर (IVF) या सुविधांची साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यादृष्टीने येथे कामही सुरू आहे.
पशुसंवर्धन निगडित कंपन्या, येणारे नवीन स्टार्टअपस्, प्रशासकीय आणि सहकारी संस्था, एन.जी.ओ.या सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान आणि दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरणाऱ्या संकल्पना निर्मिती करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्यावर या प्रकल्पाचा भर राहणार आहे. तर अत्याधुनिक गोठे, हवामानाचा ताण कमी करण्याची यंत्रणा, मिल्किंग पार्लर, मुरघास तंत्रज्ञान, सुधारित चारा उत्पादन संवर्धन, TMR तंत्रज्ञान, खाद्य रोगनिदान प्रयोगशाळा अशा सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी नेदरलँडच्या व्हॅन हॉल लॉरेन्सटाइन, वॉखनिंगन विद्यापीठ आणि डच कंपन्या यांची मदत झाली असून केंद्र सरकारची राष्ट्रीय कृषी विकास योजना, पशु संवर्धन विभाग, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि किर्लोस्कर यांचे आर्थिक सहकार्य मिळाले आहे.
या प्रकल्पामध्ये संशोधना व्यतिरिक्त प्रशिक्षण देखील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प म्हणजे जनावरांचा आधुनिक गोठा आणि संशोधन संस्था इतक्या पुरताच मर्यादित नाही, या प्रकल्पात दुग्ध
व्यवसायिकांना जनावरांच्या खरेदी पासून ते दुग्ध प्रक्रिया पर्यंतच्या सर्व बाबीवर निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. वैश्विक दर्जाचे अध्ययावत असे प्रशिक्षण वर्ग त्यासोबत त्याला लागणारी इतर उपकरणे या प्रकल्पात उपलब्ध आहेत. कोणत्याही व्यवसायाचे प्रशिक्षण ते फक्त प्रशिक्षण वर्गात घेऊन चालणार नाही त्यासोबतच प्रात्यक्षिक पाहणी हे सुद्धा महत्त्वाचे आहे. असे दूर दृष्टीकोन ठेवून प्रकल्प उभारणी करताना विचार केलेला आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष जनावरांसोबत विविध कामे करण्याची त्याचबरोबर मशीनरी हाताळण्याची संधी उपलब्ध होते. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा फायदा या व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांना निश्चित होईल.
निलेश नलावडे, सीईओ, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती – दुग्ध व्यवसायिक आता कुठे जनावरांची वंशावळ विचारू लागला आहे. अॅनिमल न्यूट्रिशन किंवा आहाराच्या नियोजन संदर्भात बोलू लागला आहे. मात्र जागतिक स्तरावरचा आधुनिक दुग्ध व्यवसायिक हा काऊ कम्फर्ट म्हणजे आरामदायक गोठा, मुक्त संचार गोठा, उच्च तापमानात गाईच्या ताणाचे व्यवस्थापन, उच्च प्रतीच्या वळूचे लिंगनिर्धारित सिमेंन किंवा (IVF) तंत्रज्ञानाचा वापर, गोठ्यातील बारीक-सारीक हालचालींसाठी सेन्सरचा वापर, काऊ मॉनिटरिंग सिस्टीम चा वापर, इत्यादी बाबत पारंगत झालेला आहे.
डॉ. धनंजय भोईटे, प्रकल्पप्रमुख – भारतातील दुग्ध व्यवसाय हासुद्धा सर्व बाबतींमध्ये साक्षर आणि सशक्त करण्याकरता या तंत्रज्ञानाचा अवलंब या प्रकल्पामध्ये केला आहे. जेणेकरून सिईंग इज बिलिव्हिंग या तत्त्वानुसार ज्ञान आणि कौशल्य हे दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, महिला, नवीन उद्योजक, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन संबंधित कंपन्यातील तज्ञ, यांना आत्मसात करता येईल.