दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा स्वातंत्र्याच्या अमृतकाळातील पंचामृत ध्येयावर आधारित असलेला समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प आहे असे मत विधिमंडळ हक्क भंग समितीचे अध्यक्ष व दौंड चे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे.
आजच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राहुल कुल म्हणाले की, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करणारा असून राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार, बारा बलुतेदार, दिव्यांग व महिला भगिनींच्या अपेक्षांना न्याय देणारा आहे. समाजाच्या सर्व घटकांचा विचार करत असतानाच रोजगारनिर्मिती, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांची निर्मिती याकडे देखील या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मेट्रो, विमानतळ, रेल्वे आदी पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करताना ग्रामीण भागातील जिल्हा व ग्रामीण मार्गांसाठी देखील विशेष तरतूद करण्यात आली आहे, धनगर समाज, अल्पसंख्याक समाज व सर्व जाती धर्मांचा विचार करण्यात आला आहे.
असंघटित कामगार, लिंगायत समाज, गुरव समाज, रामोशी समाज व वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना करतानाच बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील विकास मंडळ आदींसाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ५ लक्ष करणे, मोदी आवास योजनेद्वारे १० लाख घरकुलांचे उद्दिष्ट आदी बाबी सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या आहेत तर महिलांसाठी लेक लाडकी उपक्रमांतर्गत ७५ हजार रुपये, नोकरदार महिलांसाठी शक्ती सदन, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांसाठी वसतिगृहे, एसटीत महिलांना ५० टक्के सवलत आदी तरतुदी नारीशक्तीचा सन्मान करण्याऱ्या आहेत.