मुंबई – महान्यूज लाईव्ह
राज्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत जाहीर केली. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारही शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देणार आहे. थोडक्यात शेतकऱ्यांना आता प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. पिकविम्याचे पैसे राज्य सरकार भरणार आहे.
फडणवीस यांनी अमृतकाळातील पंचामृत ध्येयावर आधारीत हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव असून त्यांतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देणार आहे. या योजनेचा राज्यातील १.१५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्याचा ६ हजार ९०० कोटींचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
या व्यतिरिक्त आज फडणवीसांनी केलेल्या घोषणेमध्ये नैसर्गिक शेतीला राज्य सरकार प्रोत्साहन देणार असून तीन वर्षात १ हजार कोटी सरकार देणार आहे, त्याअंतर्गत राज्यात ३ वर्षात २५ लाख हेक्टर सेंद्रीय शेतीखाली आणले जाणार आहे. १ हजार ठिकाणी जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे उभारली जाणार आहेत.
राज्यात मार्केट कमिट्यांंमध्ये शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारले जाणार असून शेतकऱ्यांना जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.