नाशिक – महान्यूज लाईव्ह
इगतपुरीजवळ मुंबई आग्रा महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील लहान मुलीसह चौघांना जीव गमवावा लागला, गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन आदळली व रस्ता ओलांडून समोरून एका अपघातग्रस्त कारला घेऊन निघालेल्या क्रेनला जोरात धडकली. त्यातून हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
इगतपुरीजवळील पंढरपूरवाडी येथे झालेल्या या अपघाताने अनेकांच्या अंगावर काटा आला. कारण अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला. ही चारचाकी ह्युंडाई एसेंट कार (क्रमांक एम.एच. ०४ एफ. ए. ८२९१) मुंबईच्या दिशेने निघाली होती. मात्र अचानक पुढील चाकाचा टायर फुटल्याने ती दुभाजकावर जोरात आदळली आणि समोरून येणाऱ्या क्रेनवर आदळली.
या घटनेत चौघांचा दुर्देवी अंत झाला. यात एका चिमुकलीसह, महिला व दोघे पुरूषांचा समावेश आहे. हा अपघात पाहून अनेकांना धक्का बसला. त्यामुळे काही काळ येथील वाहतूकही विस्कळीत झाली होती. यावेळी वाहतूक निरीक्षक वालझाडे, सहायक निरीक्षक सोपान राखोंडे, हवालदार संजय क्षीरसागर आदींच्या पथकाने वाहतूक सुरळीत केली. त्यास महामार्गावरील महिंद्रा कंपनीच्या मदतपथकाने व टोलप्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली.
या घटनेतील मृतांचे कुटुंब हे ठाणे जिल्ह्यातील असून त्यामध्ये मनोरमा कौशिक (वय २८ वर्षे) रणजितकुमार कैलासनाथ वर्मा (वय ३४) व खुशी कौशिक (वय ६ वर्षे, तिघेही रा. खडकपाडा, ठाणे) व कारचा चालक कबीर राजदत्त सोनवणे (वय ३२ वर्षे रा. बदलापूर, ठाणे) यांचा समावेश आहे. या घटनेत अनुजसिंग हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.