राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : एका महिलेला जन्मापासून ते आयुष्यभर कष्ट व हाल अपेष्टाच पदरी पडते. मग ती अशिक्षित असो किंवा शिक्षित, घरकाम करून कुटुंब सांभाळत असताना महिलांनी आता पहिले स्वतःवरच प्रेम करायला शिकले पाहिजे, असे मत दौंड नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांनी व्यक्त केले.
दौंड येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम बुधवारी (दि.८) मोठ्या उत्साहात व युद्ध कार्यक्रमांनी पार पडला. दौंड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी दौंड येथील विविध शासकीय विभागात काम करणाऱ्या महिला पदाधिकारी व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस या कार्यक्रमात उपस्थितीत होत्या. यावेळी तहसीलदार प्रविणा बोर्डे म्हणाल्या की, आपली संस्कृती काय आहे हे अजूनही महिलांना समजली नाही, पण सध्या टीव्ही मध्ये दाखवणाऱ्या मालिकेत महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवली जात आहे. विडंबन करणारे दाखवले जात आहे. हे महिलांनी आपल्या आवडत्या मालिका पाहताना समजून घेतले पाहिजे.
प्रत्येक स्त्री ही घरकाम करताना मुलांचे शिक्षण पहात कुटुंब अगदी जबाबदारीने सांभाळत असते. विविध क्षेत्रात नोकरी करतानाही महिला घरातील सर्व कामे करुनच आपली नोकरी पाहत असते. मात्र हे करीत असताना महिलांनी कुटुंबावर जसे प्रेम करतात तसेच प्रेम त्यांनी स्वतःवरही केले पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुनिता चौरे यांनी उपस्थित महिलांना महिलांविषयी कायदे या संदर्भात मार्गदर्शन केले. महिलांवर अत्याचार किंवा शारीरिक व मानसिक छळ होत असेल तर कोणकोणते कायदे आहेत, कायद्यांचा दुरुपयोग न करता त्याचा योग्य उपयोग कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
एकात्मिक बालविकास विभागाच्या अधिकारी अक्षदा शिंदे यांनी महिला व बाल विकास योजनांची माहिती देत जनजागृती केली. तर योग प्रशिक्षक मनीषा देवडा यांनी महिलांच्या आरोग्याविषयी विविध योगाचे प्रात्यक्षिके सादर करीत त्याचे महत्त्व पटवून दिले.