सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : महिला पतंजली योग समिती व पतंजली योग परिवाराच्या वतीने काल इंदापूरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महिला दिनाचे औचित्य साधून योगाबरोबरच आरोग्य शिबिर, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मॅरेथॉन स्पर्धा तसेच विविध पुरस्कारांनी महिलांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिला दिन कार्यक्रम येथील शहा सांस्कृतिक भवन येथे पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 11 महिलांना समाजभूषण, आदर्श माता, आदर्श कन्या व कोविड योद्धा अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान महिला दिनानिमित्त 5 मार्च रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये अनेक महिलांची तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच 350 रुग्णांचे नाडी परीक्षण, मधुमेह, रक्तदाब आदींची तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी पतंजलीच्या आयुर्वेदाचार्य डॉ. अनामिका सिंग, डॉ. संध्या, डॉ. सोनाली, डॉ. संदेश देशमुख, श्रींगी उपचार तज्ञ शेरुजी राजपूत यांचे योगदान लाभले. श्रींगी उपचारामुळे अनेक वर्षापासून चे जुनाट सांधे दुखणे यावर रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ झालेला दिसून आला.
या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांनी योगाची प्रात्यक्षीके करून दाखवली. साक्षी सतीश चोपडे या मुलीने संगीत चालीवर अवघड अशी आसने करून दाखवली. तर महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मायाताई विंचू यांनी पसायदानावरती योगासने करून दाखविली.
पतंजलीच्या राज्य प्रभारी सुधा आळीमोरे यांनी महिला पतंजली योग समिती व पतंजली योग परिवार इंदापूरच्या या अविरतपणे 19 वर्षे चालू असलेला मोफत वर्ग कार्याचे कौतुक केले. प्रत्येक तालुक्यामध्ये रामदेवबाबा यांचे योग – प्राणायामाचे कार्य चालावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी पतंजली महिला योग समितीच्या वरिष्ठ राज्य प्रभारी सुधा आळीमोरे, ज्योती जवाहिरे, महाराष्ट्र राज्य प्रभारी कार्यकारणी सदस्या मृणालिनी कुलकर्णी, जिल्हा प्रभारी पिंपरी चिंचवड पतंजलीच्या सुशीला टोपे, तसेच इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे, मैत्रीण ग्रुप इंदापूरच्या अनुराधा गारटकर, शोभा भरणे, उमा इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
पतंजली योग परिवाराचे दत्तात्रय अनपट, मदन चव्हाण तसेच महिला पतंजलीच्या अध्यक्षा माया विंचू यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन सुनीता गलांडे यांनी तर आभार माया विंचू यांनी मानले.