भोर – महान्यूज लाईव्ह
६ मार्च रोजी वेल्हे तालुक्यातील पाबे येथील नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे याचा धारदार चाकू व सत्तूराने वार करून पिस्तूलमधून गोळ्या झाडून वेल्हे गावातील विसावा हॉटेलमध्ये खून करण्यात आला. हा खून कशामुळे झाला याची चर्चा गावागावात रंगली असतानाच आता वेल्हे पोलिस व जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने कामगिरी करीत चौघांना अटक केली आहे.
६ मार्च रोजी गुन्हा घडल्यानंतर हा गुन्हा कोणी केला आहे याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे पथक नेमण्यात आले होते.
या पथकातील सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, राहूल गावडे, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत, अक्षय सुपे यांच्यासह वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार, हवालदार योगेश जाधव, सहायक फौजदार सुरेश कांबळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
या पथकास गुन्ह्यातील आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणूसे हा हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून माऊलीसह आकाश कुमार शेटे (वय २४ वर्षे रा. शुक्रवार पेठ पुणे), यश उर्फ प्रथमेश विनायक चित्ते (वय २२ वर्षे, शुक्रवार पेठ, पुणे), अक्षय गणेश साळुंखे (वय २७ वर्षे), शुभम राजेश थोरात (मूळ रा. भालगुडी, ता. मुळशी, सध्या सर्वजण रा. शुक्रवार पेठ पुणे) यांना ताब्यात घेतले.
पोलिस तपासात ज्ञानेश्वर रेणूसे यानेच हा खून केला असून नवनाथ हा रेणुसे याने खरेदी केलेल्या जमीनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करीत होता व माऊली रेणुसे याचा मुलगा एक वर्षापूर्वी मयत झाला, त्याच्या मृ्त्यूस नवनाथ हाच कारणीभूत असल्याचा संशय या खूनामागे होता.
दरम्यान या खूनात ज्ञानेश्वर याला पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणूसे, मुलगी पल्लवी भूषण येणपुरे, मुलगी गौरी अमोल उर्फ शशिकांत शिंदे यांनी मदत केली. खूनाचा कट रचला असा पोलिसांचा आरोप आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले करीत आहेत.