दौंड : महान्यूज लाईव्ह
आज जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाने महिला दिन साजरा केला जात असताना दौंड तालुक्यात मात्र धक्कादायक घटना घडली. तालुक्यातील पारगाव व कासुर्डी येथे दोन महिलांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव (सा..मा.) येथील यमुना हनुमंत कारंडे या महिलेने सयाजी अण्णा ताकवणे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत या महिलेचे पती हनुमंत चंद्रकांत कारंडे यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दुसऱ्या घटनेत कासुर्डी येथील पुनम बाळासो टेकवडे (वय २२ ) या महिलेने राहत्या घरात पत्राच्या लोखंडी अँगल ला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लक्ष्मण बजाबा खेनट यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. दरम्यान, या दोन्हीही महिलांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा तपास यवत पोलीस करीत आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.