विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
आज ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाने कार्यक्रमाच आयोजन करण्यात केले होते. या कार्यक्रमात शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, आज सगळीकडे महिला दिन साजरा केला जातो. माझ्या मातोश्रीचा उल्लेख या कार्यक्रमात केला गेला. ही गोष्ट खरी आहे. त्या स्वातंत्र्य चळवळीत होत्या. त्या काळामध्ये आज ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो. त्यावेळी जिल्हा परिषद नव्हती.
जिल्हा लोकल बोर्ड होतं आणि संबंध जिल्ह्यातून एक भगिनी त्या लोकल बोर्डावर जायची. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून माझ्या मातोश्री लोकल बोर्डावर गेलेल्या असायच्या. त्यांचं वैशिष्ट्य हे होतं की, लोकल बोर्डाच्या बैठकीत कधीही उशिरा जायच्या नाहीत आणि कधीही गैरहजर राहायचा नाहीत.
त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि तिसऱ्या दिवशी लोकल बोर्डाची मीटिंग होती. तिसऱ्या दिवशी बारामती आणि पुण्याला त्या काळात एसटीची सर्व्हिस नसायची. खाजगी बसेस असायच्या. त्या बसेसमधून तीन दिवसांचं बालक घेऊन त्या मिटींगला हजर राहिलेल्या होत्या आणि ते तीन दिवसाचा बालक म्हणजे मी..!
मी कधीकधी गमतीने सांगतो, विधानसभेत, लोकसभेत कुठे जायला संधी मिळाली की, कौतुक होतं. पण माझ्या आईने मला तिसऱ्या दिवशीच सभागृह दाखवलं होतं. असे सांगत शरद पवार यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.