दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पेडगाव येथे शेतातील बाभळीच्या झाडाच्या कोळशाच्या कामासाठी दोघेजण मजूर म्हणून आले आणि एका इसमाचा खून करून त्याला उसाच्या पाचटाखाली लपवून ते पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. हरिभाऊ वाघमारे व त्याच्या सोबत असलेली महिला लिला ( पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा.मु. पो.नागठणे, पाली ता. रोहा जि. रायगड) अशी या आरोपींची नावे आहेत.
४ मार्च ते ६ मार्च ( सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या पुर्वी नक्की तारीख व वेळ माहीत नाही) दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेले अधिक माहिती अशी की , फिर्यादी दिलीप शंभू सांगळे (रा.शिरापूर ता.दौंड जि.पुणे ) हे शेतातील बाभळीच्या कोळशा काढून तो विकण्याचा व्यापार करीत आहेत.
सांगळे यांना २८ फेब्रुवारी रोजी एकनाथ हरिश्चंद्र कापरे ( रा.निवी आदिवासी वाडी ता.रोहा जि.रायगड ) यांनी फोन करून कोळसा काढण्यासाठी घरून चार मजुर घेऊन आलो आहे असे सांगितले. त्यानंतर सांगळे यांनी मजूर घेवून येण्यासाठी शिरापूर येथून दौंड येथे महिंद्रा पिकअप गाडी पाठवून दिली होती.
त्यानंतर एकनाथ कापरे याने ते मजूर पेडगाव येथील रामभाऊ सोनबा गोधडे यांच्या मालकीचे शेतामध्ये नेले व तेथे त्यांना सोडले. त्यानंतर २ मार्च २०२३ रोजी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक इसम व एक महिला हे कामासाठी घरी आले.
त्या दोघांना सांगळे यांनी घरी मुक्कामाला थांबून दूसरे दिवशी त्या दोघांना रामभाऊ गोधडे यांच्या मालकीचे शेतामध्ये कोळसा काढण्यासाठी सोडले, त्यावेळी तिथे चंद्रकांत (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), किसन सोनू पवार ( रा.परली जांबूळपाडा,गोंदव कातकरवाडी ता.खालापूर जि.रायगड ) हे कामासाठी हजर होते.
गोधडे त्यांना होळीचे सणासाठी पैसे देण्यासाठी गेले असता तेथे कोणी ही मजूर दिसले नाही, त्यांनी म्हणून पेडगाव गावामध्ये शोध घेतला, परंतू तेथेही ते दिसले नाहीत. त्यानंतर गोधडे यांच्या शेतात साफसफाई करीत असताना ऊसाचे पाचटा खाली एका इसमाचे पाय दिसल्याने त्यांनी सांगळे यांना हा प्रकार सांगितला.
हा मृतदेह चंद्रकांत ( वय अंदाजे ५५ ते ६०, पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) पाचटाखाली झाकून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या उजव्या डोळयाजवळ तसेच गळयाचे खाली गंभीर दुखापत झालेली तसेच त्याचा उजवा हात दंडातून मोडलेला अवस्थेत मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत दिलीप सांगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने दौंड पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.