नवी दिल्ली – महान्यूज लाईव्ह
देशातील सरकारी अधिकाऱ्यांमध्ये फिटनेस व सौंदर्याच्या बाबतीत मैलाचा दगड बनलेल्या, ७ वेळा हरियाणा केसरी व ६ वेळा भारत केसरीचा किताब जिंकलेल्या नैना कंवल या महिला पोलिस अधिकाऱ्यास अपहरणाच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासमवेत या नैना कंवल नावाच्या महिला अधिकाऱ्याने भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. ती काही अंतर गांधी यांच्यासमवेत चालली. त्यानंतर ती देशभरात चर्चेत आली होती. आता शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तिच्या घरात विना परवाना असलेली दोन पिस्तूले सापडली. पोलिस तिच्या घरात आल्यानंतर तिने ती पिस्तूले खिडकीतून बाहेर फेकल्याचा आरोप पोलिसांनी केला असून ती दोन पिस्तूले जप्त करण्यात आली आहेत.
नैना कंवल हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे. आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. सोशल मिडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. राजस्थानमध्ये तिला क्रिडा कोट्यातून नोकरी मिळाली नाही, मग तिने राजस्थानमधून चाचपणी केली आणि तिला फौजदाराची नोकरी मिळाली.
आता एका अपहरणाच्या प्रकरणातील तपासादरम्यान तिचा सहभाग असल्याची माहिती घेऊन दिल्ली पोलिस तिच्या घरी पोचले, तेव्हा तिच्या घरात दोन पिस्तूल सापडले. तिच्यावर अवैध शस्त्र घरात ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली.