राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
अंधश्रध्दाविरोधी कितीही कायदे केले, तरीदेखील कमीच पडताहेत. आज यवतमध्ये परडी भरण्याच्या कार्यक्रमात पोतराजांनी परंपरेप्रमाणे कोंबडा दातात धरला.. दातानेच त्याचे मुंडके तोडले. ही बाब पोलिसांपर्यंत पोचली आणि पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले.
ही घटना नाथाचीवाडी (ता. दौंड) येथे १० फेब्रुवारी २०२३ रोजी घडली. तर २५ फेब्रुवारी रोजी ज्याच्या घरी हा कार्यक्रम झाला, त्याच्यासह लिंगाळी येथील दोन पोतराजांवर या प्रकरणी प्राण्यांचा छळ करणे व प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 चे कलम 11 (1) (ल), पोलीस अधिनियम 1959 चे कलम 110/117, 119 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाथाचीवाडी येथे १० फेब्रुवारी रोजी देवीची परडी भरण्याचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमादरम्यान वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या दोन्ही पोतराजांकडे कोंबडा देण्यात आला. त्यांनी दातात या कोंबड्यांचे मुंडके धरून ते दातानेच तोडून कोंबडे मारून टाकले व त्याचे मुंडके सार्वजनिक ठिकाणी टाकले.
त्यावरून यवत पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नारायण जाधव यांनी फिर्याद दाखल केली व तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना १० फेब्रुवारी रोजी घडली असली तरी गुन्हा मात्र २५ फेब्रुवारी रोजी दाखल झाला. या दरम्यानच्या कालावधीत संबंधित ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज व इतर बाबीही पोलिसांनी तपासल्या होत्या. या घटनेचा पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.