दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंडमधील पोलिस भरती अॅकॅडमीमध्ये पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेताना लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी आलेगाव धुमाळवस्ती (ता. दौंड) येथील अतुल वामनराव कुतवळ व त्याची आई सौ. पार्वतीबाई वामन कुतवळ यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पिडीत तरुणी ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असून ती दौंडमध्ये पोलिस भरतीचे प्रशिक्षण सन २०१८ पासून घेत आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिची ओळख अतुल कुतवळ याच्याशी झाली.
डिसेंबर २०२२ मध्ये अतुल कुतवळ याने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली, मात्र आंतरजातीय विवाहास परवानगी मिळेल का अशी विचारणा करून पिडीतेने अतुल यास घरच्यांची परवानगी घेण्याचा सल्ला दिला. पिडीतेस तिच्या कुटुंबियांनी होकार दिला. मात्र कुतवळ याच्या घरून परवानगी मिळाली नाही, तरीदेखील मी तुझ्याशीच लग्न करणार असे सांगून अतुल कुतवळ याने १८ जानेवारी २०२३, १५ व १७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी त्याचा साखरपुडा अन्य तरुणीशी झाल्याने त्यास जाब विचारण्यासाठी बहिणीसह पिडीत तरुणी कुतवळ याच्या गावी व घरी गेली. मात्र तेथे नकार मिळाल्यानंतर पिडीत तरुणी त्याच घरी थांबली. १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी गोड बोलून कुतवळ याने जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजीही हॉटेल लेमनवूड येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे संबंधित पिडीतीने दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस करीत आहेत.