नवी दिल्ली – महान्यूज लाईव्ह
पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. ज्याचा तिही लोकी झेंडा.. अशीच प्रत्येक बापाची इच्छा असते.. त्याबरोबरच आपल्या वृध्दापकाळात मुलगा आपल्या काठीचा आधार बनावा अशीच अपेक्षा असते.. मात्र दोन्ही अपेक्षांना मुलं उतरलीच नाहीत तर? अनेक ठिकाणी बाप हवालदिल होऊन जातो.. कोणी मग वृध्दाश्रमात दिवस काढतं.. तर कोणी फुटपाथवर.. मात्र मुलांना धडा शिकवणारा बाप भेटला तर?
उत्तर प्रदेशात ही घटना घडली असून मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा गावातील नत्थूसिंह यांनी आपली साडेअकरा एकर जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे. २० वर्षापूर्वी पत्नीचं निधन झालं आणि मुलगा व सुनेने काही वर्षातच आपली वागणूक बदलल्यानं त्यांनी हा अफलातून निर्णय घेतला आहे.
अर्थात त्यांच्या या निर्णयावर टिका होण्याऐवजी त्यांना सहानुभूतीच जास्त मिळत आहे. त्यांनी कोर्टातही मुलाविरोधात खटला दाखल केला, तेव्हा न्यायाधिशासमोरच अशा मुलाला गोळ्या घातल्या पाहिजेत असे वक्तव्य केल्याने त्यांची चर्चा जास्त झाली. आता तर त्यांनी आपली जमीनच राज्यपालांच्या नावावर केल्याने राज्यात त्यांची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे नत्थूसिंह यांच्या एका मुलाचे निधन झाले असून आताचा मुलगा शिक्षक आहे. शिक्षकाचेच संस्कार चुकीचे निघाल्याने बापाने हे पाऊल उचलले आहे. आपले अंत्यसंस्कारही मुलाने करू नयेत असे मृत्यूपत्र नत्थूसिंह यांनी केले आहे.