विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
हौसेला मोल नसते असे म्हटले जाते.अनेकजण आपली किंवा आपल्या मुलांची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च करतात. कधी कधी लाखो रुपये यात खर्च केले जातात. आपल्या मुलाची अशीच काहीशी हौस पूर्ण करण्यासाठी वसईतील कामन येथे एका व्यक्तीने लाखो रुपये खर्च केला. या वाढदिवसाची वसई परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त नवीत भोईर यांनी चक्क ह्युंडाई वेर्ना कारची प्रतिकृती असलेला २२१ किलोचा केक आणला. हा भला मोठा केक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील गर्दी केली.
नवित भोईर यांचा मुलगा रेयांश याचा शनिवारी दुसरा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त वेर्ना कारची प्रतिकृती असलेला चक्क २२१ किलोचा केक आणला. हा केक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
अगदी शाही लग्नसोहळ्याप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलाच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच लहान मुलांच्या खेळांचे आयोजन केले होते.
या वाढदिवसाला राजकीय,सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. नवीत भोईर यांना प्रसिद्धीच्या झोतात यायचे नव्हते, मात्र या केकचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांना या आगळ्यावेगळ्या केकबद्दल व वाढदिवसाबद्दल माहिती मिळाली. रेयांशच्या पहिल्या वाढदिवशी हेलिकॉप्टरमधून त्याची एन्ट्री करण्यात आली होती. अशी माहितीही त्यांनी दिली.