दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
होळीच्या सणाच्या पूर्वसंध्येला वाई शहरात अचानकच जिल्हा पोलिस अधिक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी चालत फिरू लागले तर? साहजिकच अनेकांना काहीतरी घडले आहे असे तरी वाटेल किंवा ही पोलिसांची रंगीत तालीम असावी असे वाटेल..! पण वाई शहराच्या सर्व भागांची माहिती ग्राऊंड रिपोर्टवरून घ्यायची ठरवलेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी आज वाईकरांना आश्चर्याचा धक्काच दिला.
आज संध्याकाळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जानवे-खराडे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक निरीक्षक आशिष कांबळे, फौजदार सुधीर वाळूंज, स्नेहल सोमदे, श्री. पवार यांच्यासमवेत वाईत पायी फिरत प्रत्येक भागाची पाहणी केली.
समीर शेख यांनी पोलिस कर्मचाऱ्या्ंच्या ताफ्यासह आमंत्रण चौक, विश्वकोष शाहीर चौक, भगवा कट्टा, जुने ग्रामीण रुग्णालय या मार्गाने वाई नगरपालिका चौक, भाजी मंडई, सोनार गल्ली, किसनवीर चौक अशी पायी फिरून शहराची माहिती घेतली.
एवढ्यावर न थांबता रविवार गणपती, जामा मस्जीद, रामडोह आळी मार्गे पी आर चौक, तेथून पुन्हा किसनवीर चौक मार्गे नवीन कृष्णा पुलावरून थेट डिवायएसपी कार्यालय असा फेरफटका मारला व वाईच्या रस्त्यांची भौगोलिक रचना कशी आहे याची प्रत्यक्ष पाहणी केली.