मुंबई- महान्यूज लाईव्ह
कसब्याच्या निकालानंतर भाजप- शिंदे गटात असलेल्या तणावात आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक बॉम्ब टाकून गड मजबूत करण्यासाठीचा इशारा दिला. भाजपमधील ४० ते ४५ आमदार हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते कोणत्याही क्षणी स्वगृही येऊ शकतात असे भाकित करीत भाजपचे टेन्शन वाढवले आहे.
कसब्याची मतमोजणी होऊन जाऊ द्या, मी सगळं काही सांगतो असे पवार म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र व आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो असे सांगत भाजपला इशारा दिला आहे.
अजित पवार म्हणाले, आमच्यातील काही नेते सन २०१४ च्या मोदी लाटेत भाजपमध्ये गेले. नरेंद्र मोदींचा करिश्मा व ते सत्तेत आल्यानंतर खूप काही बदलेल असे वातावरण तयार केले गेले. त्यांच्याकडे बघून जनतेने मतदानही केले आणि त्यांना पूर्ण बहुमत दिले. त्यामुळे त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत ज्यांना राजकारण करायचे होते, ज्यांना फक्त आपल्या मतदारसंघात वर्चस्व ठेवायचे होते ते लोक त्यावेळी भाजपमध्ये गेले.
पवार म्हणाले की, पण आता परिस्थिती बदलली आहे, आता हेच लोक त्यांच्या आताच्या पक्षनेतृत्वाला आमची चूक झाली असे सांगू शकतात आणि पूर्वीसारखं पक्षाच्या विचारधारेला चिकटून राहण्याचा काळ संपला आहे, त्यामुळे आता येत्या काही दिवसांत राजकीय उलथापालथ मोठी होऊ शकते.