राजवंश आठवडा बाजार संघटनेचा समाजापुढे नवा आदर्श; हृदयविकाराने निधन झालेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयास केली ५० हजार रुपयांची मदत
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
एखाद्या सहकाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास, त्यास शासकीय- निमशासकीय कार्यालय अथवा संस्थेतील सहकारी वर्गणी काढून मदत करतात, हा आजवरचा शिरस्ता पहावयास मिळतो, मात्र आठवडा बाजारात तरकारी विक्री करणाऱ्या सामान्य शेतकरी कुटुंबातील विक्रेत्याचा मृत्यू झाल्यास त्यास मदत कोण करणार ? हा प्रश्न उभा राहतो.
मात्र बाजारकऱ्यांनी बाजारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या राजवंश आठवडा बाजार संघटनेने माणुसकी काय असते हे दाखवून दिले. या संघटनेने खोलवडीतील तरकारी विक्रेत्याच्या कुटुंबियास ५० हजार रुपयांची रोख मदत करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. बाजार संघटनेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्वसामान्य व्यक्तीचे अकाली निधन झाल्यास, त्याला त्यास विमा संरक्षण असते. त्याच्या कुटुंबियास नातेवाईक अथवा मित्रमंडळी मदत करतात, हे आजवर सर्वत्र पहावयास मिळते. मात्र आठवड्यातले सात दिवस वेगवेगळ्या गावात जाऊन बाजारांमध्ये विक्रेता म्हणून ऊन, वारा आणि पावसात वर्षभर राबणारे विक्रेते मात्र अशा मदतीपासून कायमच वंचित राहिलेले आहेत.
समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या विक्रेत्यांचे संघटन गेल्या काही वर्षांपूर्वी कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार व वाठार स्टेशन येथील मुकुंदराज काकडे यांनी राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून केले. बाजारातील व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ही संघटना काम करते.
केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात या संघटनेची ओळख आहे. वाई तालुक्यातील खोलवडी येथील सर्वसामान्य तरकारी विक्रेते चंदू माने यांचे काही दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाचा आधारवडच गेला. संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले.
दर मंगळवारी पाचवडमध्ये भरणाऱ्या आठवड्या बाजारात माने यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. मुकुंदराज काकडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ही बाब खटकत होती. त्यांनी पुढाकार घेऊन संभाजी पिसाळ, विनोद पवार, जालिंदर शिंदे, संदीप यादव, सुनील निदान, दिलीप चव्हाण, शत्रुघ्न यादव, मंगेश गार्डी व मंगेश जाधव यांनी माने यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली. कोणालाही सक्ती न करता, ज्याला मनाला येईल तेवढी रक्कम तो जमा करू लागला. बघता बघता ५० हजार रुपये वर्गणी जमा झाली.
संघटनेचे संस्थापक जयवंत पवार यांच्या हस्ते खोलवडीत जाऊन माने कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आठवडा बाजारातील व्यापारी उपस्थित होते. राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून झालेली ५० हजार रुपयांची मदत ही माने कुटुंबियांना फार मोठी रक्कम वाटली. ते या मदतीने अक्षरशः भारावून गेले. खोलवडी ग्रामस्थांनी राजवंश आठवडा बाजार संघटनेला धन्यवाद दिले.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व आपल्या उदरनिर्वाहासाठी वर्षभर राब राब राबणाऱ्या बाजार आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांचे संघटन करण्यासाठी आणि उत्कर्षासाठी आपण कायम कटिबद्ध असून, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या या व्यापारी वर्गास निश्चितपणे सहकार्य केले जाईल, त्यांना गरज पडेल तेथे मदत केली जाईल अशी ग्वाही जयवंत पवार यांनी दिली.