नागपूर – महान्यूज लाईव्ह
सोशल मिडीयाने काही चांगले फायदे दिले, तसे तोटेही दिले. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन फक्त नववीतील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या ठाकूर नावाच्या युवकाने तिच्यावर बलात्कार केला.. ती गर्भवती राहीली.. मात्र त्यापुढची धक्कादायक बाब म्हणजे कोणाला कळून आपली व आईवडीलांची अब्रू जाऊ नये म्हणून त्या नववीतील मुलीने यू-ट्यूबवर प्रसूती कशी करायची हे पाहून स्वतःची प्रसूती केली.. बाळाचा जीव घेतला..आता तिची प्रकृती चिंताजनक आहे.
अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने राज्यातील पालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण करून ठेवला आहे. मुळात या मुलीला गर्भवती राहील्यानंतरही तिच्या आईच्या लक्षात कसा प्रकार आला नाही याचे कोडे आहेच, मात्र अलिकडच्या मुलांमध्ये अर्धवट माहिती व अर्धवट ज्ञानावर विश्वास ठेवायचा आहे हेच मुळी चिंताजनक आहे.
घटनेतील मुलगी १५ वर्षांची असून ती नववीत शिकते. तिची आई खासगी ठिकाणी काम करते. वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर अकाऊंट खोलून इन्स्टाग्राम पाहणाऱ्या या मुलीची ठाकूर नावाच्या युवकाबरोबर ओळख झाली. सुरवातीला चॅटींग, नंतर घरी येणे जाणे आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले व प्रेमाच्या ओढ्यात तिला ओढून त्याने वारंवार बलात्कार केला.
यातून ती मुलगी गर्भवती राहीली. गर्भवती राहील्यानंतर तिने आईला सांगितले नाही. उलट यू ट्यूबवर प्रसूती कशी करायची हे ती पाहत राहीली. मग तिने त्यासाठीचे साहित्य आणले व शुक्रवारी तिला पोटात कळा येऊ लागल्याने तिने यू -ट्यूब बघून स्वतःची प्रसूती केली.
बाळाला जन्म दिला, मात्र बाळ ओऱडल्यास आपली अब्रू जाईल म्हणून पट्ट्याने गळा आवळून बाळाचा जीव घेतला. बाळाचा मृतदेह घराच्या माळ्यावर दडवून ठेवला, मात्र तोपर्यंत चुकीच्या पध्दतीने तिची प्रसूती झाल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊन तिला अत्यवस्थ वाटू लागले.
दुसरीकडे घरी आल्यानंतर आईला रक्ताचे डाग जमीनीवर दिसल्याने तिला शंका आली. तिने मुलीला विचारणा केली आणि सारा प्रकार बाहेर आला. आईने तिला लगेचच शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी प्राथमिक तपास केला आहे, मात्र या प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले.