लाईनमनने सुरक्षेची काळजी घेऊनच कामकाज करावे – उपकार्यकारी अभियंता मोहन सुळ
किशोर भोईटे ,महान्यूज लाईव्ह ,सणसर
दोन मिनिट वीज गेली तर सगळ्यांच्या भुवया उंचवतात, लाईन मनला बोलणार नाही तर नवल, मात्र दोन मिनिटात लाईट लगेच आली तर त्या लाईनमनची आठवण सुद्धा राहत नाही. मात्र आज केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने 4 मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. आणि आजच्या दिवशी संपूर्ण देशात हा दिवस लाईनमन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
सामान्य नागरिकाला विजेच्या रूपाने प्रकाश देणारा वीज वितरण कंपनीचा लाईनमन नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे.स्वतःचा जीव धोक्यात घालून वीज दुरुस्तीचे काम करत असताना लाईनमनने पुरेशी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे.असे मत वीज वितरण कंपनीचे वालचंदनगरचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ यांनी व्यक्त केले.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने निर्देशित केल्याप्रमाणे 4 मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी वीज वितरण कंपनीचे लाईनमन व लाईन वुमन यांचा सत्कार करण्यात आला. ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी सांगितले की या दिनामुळे लाईनमनचे महत्व समाजाला समजेल. ग्राहक आणि वीज वितरण कंपनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे लाईनमन आहे.महावितरण बरोबरच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनेही आजचा दिवस देशभरात साजरा करण्यात आला असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व ग्राहक सेवेची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमात ग्राहक पंचायतीचे इंदापूर तालुका अध्यक्ष किशोर भोईटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवासी महासंघाचे प्रमुख वैभव निंबाळकर,भिगवणचे शाखा अभियंता राजेश भगत, लासुर्णेचे अजितसिंह यादव, वालचंदनगरचे स्वप्निल जोरी, तावशीचे महेश चौगुले, बिलिंग विभागाचे अस्लम शेख, विकास पवार, मानव संसाधन विभागाचे शाहिद शेख हे अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.