दौंड, महान्यूज लाईव्ह.
वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या चिंकारा जातीच्या हरणाला रोटी येथील जागृत वन्यप्रेमी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तत्पत्तेमुळे वेळेत उपचार मिळाल्याने नवे जीवदान मिळाले आहे. पाटस ते पंढरपूर या नव्याने होत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरती दौंड तालुक्यातील रोटी हद्दीतील वन विभागाच्या राखीव वनक्षेत्रातील वन्य प्राणी अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करीत रस्ता ओलांडत असतात, अन्नपाण्याच्या शोधात एका हरीण रस्ता ओलांडताना महामार्गावरील भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने एक चिंकारा जातीचे हरीण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दिनांक ३) रात्री दहा वाजण्याच्या आसपास घडली.
या घटनेची माहिती मिळतात रोटी येथील वन्यप्रेमी नवनाथ साळुंखे , महेश शितोळे, विठ्ठल शितोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व दूरध्वनीवरून दौंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या अपघाताची माहिती कळवली, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल शितल खेंटके यांनी माहिती मिळताच वनरक्षक पद्मिनी कांबळे, वन कर्मचारी बाबासाहेब कोकरे, रमेश कोळेकर यांना घटनास्थळी जाण्याचे सूचना दिल्या,
वनरक्षक पद्मिनी कांबळे व वन कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली तसेच यावेळी दौंड येथील वन्यजीव बचाव पथक ही घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने जखमी हरणाची आरोग्य तपासणी करत प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली.
दरम्यान, याच ठिकाणी मागील महिन्यात वीस दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत एका मादी हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सध्या रोटी व हिंगणीगाडा हद्दीत महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच हद्दीत मोठ्या प्रमाणावरती वनविभागाचे क्षेत्र असून अनेक वन्यप्राणी आहेत. वाहनाच्या धडकेत अपघात होऊन वन्यप्राण्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.