बारामती – महान्यूज लाईव्ह
आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झालेला एका कुटुंबाचा सन्मान हा शेती आणि शेतीला वाहिलेल्या प्रत्येक श्रमाच्या पुजाऱ्याचा सन्मान होता.. कोऱ्हाळे येथील भगत कुटुंबाने कामगिरीच तशी केली होती. या एकत्र कुटुंबाने आज आपल्या वडीलधाऱ्यांनी पाहिलंल स्वप्न साकार केलं.. ७५ एकरात तब्बल ५ हजार २०० टन ऊस उत्पादित करून कारखान्याला घातला..आणि त्यांच्या या श्रमाचं ऋणनिर्देश मानून या घरातील प्रत्येक श्रमाच्या पुजाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कारखान्याचे संपूर्ण संचालक मंडळ या कुटुंबाच्या घरी पोचले.
कारखान्याचे विद्यमान संचालक सुनील भगत व कारखान्याचे ३५ वर्षे संचालक राहीलेले स्वर्गीय रामभाऊ भगत यांच्या एकत्रित कुटुंबाच्या घरी जणू कारखानाच आपल्या दारी अशा पध्दतीने सर्व संचालक पोचले आणि त्यांनी संपूर्ण भगत कुटुंबाचा सन्मान केला.
भगत कुटुंबियांची एकत्रित १५० एकर शेती आहे. प्रत्येक पिकात उच्चांकी उत्पादन घेण्याची या कुटुंबाची रित आहे. त्यामुळे गव्हापासून उसापर्यंत सातत्याने उत्पादनात वरचा आलेख गाठण्यात हे कुटुंब आजवर यशस्वी झाले आहे. कधीकाळी १२५० टन उसापासून सुरवात केलेल्या या कुटुंबाने यावर्षीच्या हंगामात ५ हजार २०० टन उसाचा पुरवठा कारखान्याला केला आहे. हेच स्वप्न या कुटुंबातील दूरदृष्टीचे द्रष्टे प्रमुख स्वर्गीय रामभाऊ भगत यांनी पाहिले होते. त्यांच्या दुसऱ्या पिढीने हे स्वप्न पूर्ण केले.
नुकताच या हंगामातील भगत यांच्या उसाच्या तोडीचा अध्याय पूर्ण झाला. यावर्षी ७५ एकर क्षेत्रातील उसाची तोडणी झाली. सरासरी ६७ टन ऊस शेतात भरला. ५ हजार टनांपेक्षा अधिक ऊस या हंगामात भरला. हे स्वप्न रामभाऊ भगत यांनी अनेकदा बोलून दाखवले होते. पाठीमागच्या मंडळींनी हे प्रत्यक्षात साकार केले. त्यांच्या १५० एकर क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली असून शेतीत नवनवे प्रयोग सातत्याने केले जातात.
भगत कुटुंबाची एकत्रित १५० एकर शेती. खरंतर अलिकडच्या काळात मुळात संयुक्त कुटुंब पध्दती फारशी राहीलीच कुठे? मात्र भगत कुटुंबियांची रितच निराळी. स्वर्गीय रामचंद्र भगत, गुलाबराव भगत, नारायणराव भगत या तीन भावंडांचे हे भगत कुटुंब. रामभाऊ यांची मुले अभियंता बन्सीलाल भगत, एमएस्सी अॅग्री पदवीधारक विलास भगत, गुलाब भगत यांचा शेताची धुरा अंगावर घेतलेले सुपुत्र संजय भगत, नारायण भगत यांचे डॉ. यशवंत भगत व सुनील भगत ही दोन मुले असा हा संयुक्त परिवार आहे.
आपली शेती दैदिप्यमान असली पाहिजे. कुटुंबातील प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केली पाहिजे हा रामभाऊ भगत यांचा दृष्टीकोन होता. त्यानुसार थोरला मुलगा अभियंता झाला. दुसरा मुलगा बीएस्सी, एमएस्सी अॅग्री करून शेतीत दुसरा रमला. एका भावाचा मुलगा शेतीत हवा म्हणून संजय भगत या पुतण्याला शेतात लक्ष देण्याचा सल्ला दिला आणि उत्पादनावर भर देण्याची सूचना केली. तिसऱ्या भावाच्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज राज्यातील प्रतिथयश आयुर्वेदीक तज्ज्ञ म्हणून यशवंत भगत परिचित आहेत. एका मुलाला राजकारणात राहण्याचा, मात्र सहकाराचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला., त्यातून सुनिल भगत हे सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष झाले. आज विद्यमान संचालक आहेत.
समाजकारणातही या कुटुंबाचे योगदान मोठे..
सन १९७९ जनता पक्षाचे अधिवेशन त्यांच्या घरी पार पडले होते. तेव्हा रामभाऊ भगत यांच्या घरी राजारामबापू पाटील मुक्कामी होते. ना.ग. गोरे. एस.एम. जोशी यांनी देखील भगत यांचे घर सर्किट हाऊस आहे की काय असे वक्तव्य केले होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी देखील शेतीविषयक धोरणांची रामभाऊ भगत यांच्यासमवेत चर्चा केल्याची नोंद आहे. चित्रपट कलावंत, साहित्यिक, शेतीतज्ज्ञ अनेकांनी भेट दिली.