इंदापूर – महान्यूज लाईव्ह
कुटुंबात पती व सासूकडून मानसिक व शारीरीक छळ होत असल्याने पत्नीने काल रात्री विषारी औषध घेतले आणि तिची आज जीवनयात्रा संपली.. तिच्या आईने पती व सासूविरोधात फिर्याद दिली, मात्र त्याविरोधात कारवाई कशी करणार? कारण आज दुपारी त्यानेही पत्नी गेली, म्हणून गळफास घेतला आणि आपलेही आयुष्य संपवले..ही घटना सणसर व जाचकवस्तीच्या दरम्यान ३९ फाटा येथे घडली.
रेश्मा आयुब शेख (वय ३० वर्षे रा. सणसर, ३९ फाटा ता. इंदापूर) व आयुब बाशा शेख (वय ३५ वर्षे रा. सणसर, ३९ फाटा, ता. इंदापूर जि. पुणे) अशी या दुर्दैवी पती-पत्नीची नावे आहेत.
रेश्मा हिने काल रात्री पावणेअकराच्या दरम्यान विषारी औषध प्राशन केले, तिला उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृ्त्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच व नातेवाईकांना निरोप दिले असतानाच आज दुपारी तिचा पती आयुब यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान काल रात्री रेश्मा हिने विष घेतल्यानंतर तिची आई रशिदा सैफन शेख (रा. आसू, ता. फलटण) यांनी पती आयुब बाशा शेख व बाळी बाशा शेख (रा. ३९ फाटा सणसर ता. इंदापूर जि. पुणे) यांच्याविरोधात भवानीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
त्यावरून पोलिसांनी आयुब व बाळी या दोघांवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र आज दुपारी अचानक आयुब याने खाराओढा परिसरात गळफास घेतल्याने परिसरात अनेकांना धक्का बसला. मजूरी करणारे हे कुटुंब कोणाच्याही अध्यात ना मध्यात असल्याने दोघाही पतीपत्नीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.