जंक्शनला रेल्वेस्थानकावर रेल्वे डब्याला आग! प्रवाशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली!
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड जंक्शन येथील रेल्वे स्थानकात साइडिंगला लावलेल्या रेल्वेच्या एका रिकाम्या डब्ब्याला अचानक आग लागली, मात्र या डब्यात प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या आगीत रेल्वेच्या डब्याचा मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दौंड जंक्शन रेल्वे स्थानकावर शुक्रवारी ( दि. ३) सकाळी साडे दहा वाजण्याच्या आसपास फलाट क्रमांक सहा पुढील पुणे बाजूला असलेल्या लोहमार्गावर प्रवासी डब्ब्यांचा एक रॅक साइडिंगला लावलेला उभा होता. त्यापैकी एक डबा, ज्यामध्ये विकलांगासाठी राखीव आसन, मालवाहतूक आणि रेल्वे गार्ड कक्ष एकत्र आहे, त्याला अचानक आग लागली.
आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत वाजविले जाणारे भोंगे वाजवून यंत्रणेला सतर्क केले. तसेच दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने ही आग विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला गेला.
दरम्यान या आगीमुळे गार्ड डब्ब्यातील विद्युत उपकरणांसह सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धांदल उडाली मात्र दौंड नगरपालिका अग्निशामक बंबाच्या मदतीने रेल्वे प्रशासनाला यश आले मात्र रेल्वे डब्यात प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.