दौंड : महान्युज लाईव्ह
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील टोल प्लाझा नाक्यावर टोलची पावती आकारत उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मिनी ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोलनाक्यावर शुक्रवारी ( दि ३) सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या आसपास सोलापूर बाजुकडून पुणे बाजुला जाणाऱ्या टोल नाक्याच्या लेनवर टोल पावती देण्यासाठी उभा असलेल्या टँकरला सोलापूर बाजूकडून भरधाव वेगाने येत असलेल्या मिनी बसने धडक दिली.
या बसचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात वाहनचालक सचिन दिनेश कांबळे (वय 30 रा. अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. तर या बसमधील १३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे फौजदार प्रशांत मदने, पोलीस नाईक अजित इंगवले, पोलीस शिपाई समीर भालेराव, पोलीस मित्र रमेश चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली, या अपघातातील जखमींना परिसरातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले.