दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
बावधन (ता. वाई) येथील राज्यात प्रसिद्ध असलेली बगाड यात्रा येत्या 12 मार्च 2023 रोजी होणार आहे.याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज बावधन ग्रामपंचायतीत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वाई तालुक्याचे सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख तसेच यात्रा कमिटी, ग्रामपंचायत बावधन व गावातील नागरिक यांची बैठक झाली.
त्यावेळी तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव, उपअभियंता श्री. म्हेत्रे, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री. जाधव, महावितरणचे अधिकारी, सचिन जाधव मंडळ अधिकारी, संकेत साळुंखे, तलाठी बावधन व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकी मध्ये तहसीलदार भोसले यांनी सालाबाद प्रमाणे या वर्षीही सदरची यात्रा उत्साहात परंतु शांततेत तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत बिघडणार नाही याची दक्षता घेऊन पार पाडण्याचे आवाहन केले. या वेळी संबंधित प्रशासकीय विभागांना यात्रा कालावधी दरम्यान नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करावे, विजेचे भारनियमन करू नये, गावात तसेच बगाड ने – आण करण्याच्या रस्त्यावर स्वच्छता ठेवावी, फ्लेक्स लावताना गावातील शांतता व सलोखा बिघडू नये तसेच आवश्यक त्या प्रमाणात आरोग्य पथके तैनात करावीत अशा सूचना दिल्या.
या वेळी पोलीस निरीक्षकांनीही यात्रा कालावधी मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस गावातील सरपंच, उपसरपंच, यात्रा समिती सदस्य तसेच श्री. शशिकांत पिसाळ, श्री. मदन भोसले, श्री. दीपक ननावरे, श्री. तानाजी कचरे, श्री. विक्रम वाघ, श्री. दिपील पिसाळ तसेच गावातील अन्य प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी उपस्थित होते.