प्रशासनाच्या नाकावर टिचून वरवंड परिसरात सुरू आहे बेकायदा माती वाहतूक! कारवाईची मागणी!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड, हातवळण ,कडेठाण परिसरात शेतकऱ्यांना हाताशी धरून शेतजमिनीतून माती उपसा करून हायवा वाहनाच्या साह्याने खुलेआम भरधाव वेगाने बेकायदा वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या समोरून ही वाहतूक सुरू असुन ही कसलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून वरवंड, हातवळण व कडेठाण परिसरात शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या शेत जमिनीतून जेसीबी मशीनच्या साह्याने माती उपसा केला जात आहे. मोठ्या हायवा, जड वाहनांमधून ही माती वाहतूक बेकायदारित्या खुलेआम केली जात आहे. मातेने भरलेले हे हायवा डंपर वाहने हातवळण ते कडेठाण आणि कडेठाण ते वरवंड या मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने तसेच पुणे सोलापूर महामार्गावरून चौफुला तसेच हातवळण -कडेठाण-दापोडी- केडगाव या मुख्य रस्त्यावरून वाहत आहेत.
वीटभट्टीला ही माती विकली जात आहे. कडेठाण, वरवंड गावातून शाळा व महाविद्यालयांच्या समोरुन भरधाव वेगाने ही वाहतूक सुरू असते. सध्या बारावी व दहावीची केंद्राची परिक्षा सुरू आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत ही माती वाहतूक करणारी वाहने शाळेच्या समोरून भरधाव वेगाने ये – जा करीत आहेत. त्याचा नाहक त्रास शालेय विद्यार्थ्यांना होत आहे.
या जड वाहनांमुळे शेतकऱ्यांचे दळणवळण करणाऱ्या शेतजमिनीतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याचा नाहक त्रास सध्या शेतकऱ्यांनाही होत आहे, मात्र राजकीय नेत्यांच्या जवळीक असलेल्या व त्यांच्या कार्यकर्त्याकडून ही बेकायदा माती वाहतूक केली जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी व नागरिक कुठेही तक्रार करीत नाहीत.
रॉयल्टी फक्त नावालाच
दरम्यान, माती उपसा करण्यासाठी महसूल विभागाकडून थोडी फार परवानगी केली जाते. शेतकऱ्यांच्या नावाने डेव्हलपमेंट करायचे आहे असा अर्ज करून माती उपसा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करायचा, अर्जात फक्त दीडशे – दोनशे ब्रास माती उपसा करायचा आहे असे सांगून प्रतिज्ञापत्र करायचे आणि प्रत्यक्षात मात्र हजार ब्रास मातीचा करायचा आणि त्याची बेकायदा वाहतूक करायची.
शेतकऱ्यांच्या नावाने सध्या हे माफिया महसूल व वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकून दिशाभूल करीत आहेत. लाखो रुपयांचा महसूल सध्या बुडवला जात आहे. प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष घालून माती उपसा केलेल्या शेत जमिनीचा पंचनामा करून मोजणी करून महसूल वसुल करावा, संबंधितांवर कडक अशी कायदेशीर कारवाई करावी. तसेच बारामती चौफुला फाट्यावरील वाहतूक पोलिसांनी बेकायदा माती उपसा करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहेत.